उंब्रजच्या जुन्या आठवणींचा साक्षीदार हरपला! माणुसकीचा झरा असलेले 'पंढरी बुवा' अनंतात विलीन
उंब्रज दि (प्रतिनिधी):-
कपाळावर अबीर-गुलाल, डोक्यावर शुभ्र गांधी टोपी, अंगात साधा शर्ट-लेंगा आणि चेहऱ्यावर कायम एक निरागस, मनमोकळं हास्य... उंब्रज स्टॅण्डच्या बाहेरच्या बाजूला गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून एका विजेच्या खांबाला छत्री बांधून आपला छोटासा संसार थाटणारे 'बुवा' अर्थात सर्वांचे लाडके 'पंढरी' यांचे काल (दि. २३ नोव्हेंबर) दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने उंब्रजच्या बदलत्या काळाचा एक जिवंत साक्षीदार आणि साधेपणातून माणुसकी जपणारे एक दर्यादिल व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण उंब्रज परिसरातून हळहळ व्यक्त होत असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.
जुन्या उंब्रजच्या आठवणींचा एक दुवा निखळला
पंचवीस-तीस वर्षांपूर्वी उंब्रजमध्ये भरावपूल होण्यापूर्वीचा काळ बुवांच्या रूपाने आजही जुन्या पिढीच्या डोळ्यासमोर जिवंत होता. गोकुळ हॉटेलबाहेरील त्या मोठ्या झाडाखाली बुवांचे पहिले छोटेखानी दुकान होते. शेजारीच कुरकुटेंची पानपट्टी, फळांचे गाडे, मुख्य रस्त्यावरील तीन गोल पाईपचे बॅरिकेड्स आणि झाडांच्या सावलीत काकड्या, पेरू, द्राक्षे विकणारे छोटे व्यापारी अशी ती गजबजलेली बाजारपेठ होती. मराठी शाळेच्या बाजूला टोपल्या विणणारे बुरडाचे नाना ऊस ट्रॅक्टरमधून उसाचे तुकडे काढून शाळकरी मुलांना वाटायचे. पुढे अनु भोजनालय, संतोष हॉटेल, इंगवले मटण शॉप, काळोजी सायकल मार्ट अशा दुकानांच्या रांगेत बुवांचा वावर असायचा.
कोणाचेही काहीही काम असो, बुवा नेहमी हसतमुखाने धावून जायचे. काळाच्या ओघात भरावपूल झाला, जुनी व्यापारी लाईन इतिहासजमा झाली; पण एक चॉकलेटी आणि काळा दोरा, राफी, दोन ब्रश, पॉलिशची बुदली आणि चमड्याचे दोन-चार तुकडे इतक्याच मोजक्या साहित्यावर उभा असलेला बुवांचा व्यवसाय आणि त्यांचा साधेपणा अखेरपर्यंत तसूभरही बदलला नाही.
'युज अँड थ्रो'च्या जमान्यातही जपलेला स्वाभिमान
पूर्वी खाजगी वाहने कमी असल्याने एसटी स्टॅण्डवर प्रवाशांची मोठी वर्दळ असायची. बूट पॉलिश करणारी आणि चपला सांधून घेणारी जुनी पिढी असल्याने बुवांच्या हाताला भरपूर काम असायचे. अलीकडच्या 'युज अँड थ्रो'च्या जमान्यात चप्पल शिवण्यापेक्षा थोडे पैसे घालून नवीन चप्पल घेण्याकडे लोकांचा कल वाढला, त्यामुळे त्यांचा व्यवसाय मंदावला होता. तरीही, उतारवयात कोणापुढेही हात न पसरता परिस्थितीशी दोन हात करण्याची त्यांची चिकाटी कायम होती.
गरजू विद्यार्थ्यांसाठी 'पांडुरंगाचे' रूप
बुवांचा स्वभाव अत्यंत पोरखट आणि आनंदी होता. अनेकजण त्यांची चेष्टा-मस्करी करायचे, पण त्यांचा संयम आणि शांत स्वभाव वाखाणण्याजोगा होता. आज चाळीशी-पन्नाशीत असलेल्या अनेकांच्या बालपणीच्या आठवणीत बुवांचे ऋण कायमचे कोरले गेले आहेत. पूर्वी वर्षभर नवीन चप्पल मिळायची नाही; तुटलेली चप्पल दोन-तीनदा शिवूनही पुन्हा तुटायची. अशा वेळी खिशात पैसे नसतानाही बुवांनी अनेकांना मोफत चप्पल शिवून दिली आहे. ग्रामीण भागातून उंब्रजमध्ये शाळा-कॉलेजसाठी येणाऱ्या गरीब मुला-मुलींची चप्पल तुटली, तर पैसे असोत वा नसोत, बुवा ती आनंदाने शिवून द्यायचे. त्यांच्या या निस्वार्थी सेवेत अनेकांना साक्षात 'पांडुरंगाचे' दर्शन घडायचे.
उंब्रजकरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
अनेक दशके एकाच व्यवसायात अत्यंत प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने टिकून राहिलेले 'पंढरी बुवा' हे उंब्रजच्या सामाजिक आणि सांस्कृतिक आठवणींचा एक अविभाज्य भाग होते. त्यांच्या निधनाने जुन्या उंब्रजची एक शेवटची खूण हरपल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशा या कष्टाळू, दिलदार आणि माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला उंब्रजकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!
Comments
Post a Comment