सावरघर येथील कथित बेकायदेशीर उत्खनन व वृक्षतोडीची सखोल चौकशी करा; कृती समितीची जोरदार मागणी.


सावरघर येथील कथित बेकायदेशीर उत्खनन व वृक्षतोडीची सखोल चौकशी करा; कृती समितीची जोरदार मागणी.
सातारा दि 23 :- रवी वाकडे
सावरघर (ता. पाटण) येथील गट क्रमांक ३३ आणि ३४ मध्ये केवळ तात्पुरती कामगार वसाहत व साहित्य ठेवण्यासाठी शेड उभारण्यात येणार असल्याचा खुलासा अदानी कंपनीने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी लाखो ब्रास उत्खनन करून हजारो झाडांची कत्तल कशी झाली? असा संतप्त सवाल 'अदानी-तारळी पी.एस.पी. प्रकल्प विरोधी कृती समिती'ने उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाळासाहेब सपकाळ, ॲड. सिद्धेश पवार आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
कृती समितीने उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न:
• उत्खननाचे परवाने: कामगार वसाहतीच्या नावाखाली लाखो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करण्यासाठी संबंधित महसूल व खनिकर्म विभागाचे वैध परवाने घेतले आहेत का?
• तारळी धरणातील प्रदूषण: हजारो डंपरच्या माध्यमातून उत्खनन केलेली माती आणि दगड थेट तारळी धरणाच्या पात्रात कोणाच्या परवानगीने टाकण्यात आले? यामुळे पाण्याचे मोठे प्रदूषण झाले असून, याबाबत जलसंपदा व प्रदूषण नियंत्रण मंडळाला पूर्वकल्पना दिली होती का?
• हजारो झाडांची कत्तल: पर्यावरणाचा समतोल बिघडवून हजारो वृक्षांची तोड कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या परवानगीने करण्यात आली?
• प्रकल्प मंजुरी क्षेत्र: गट क्रमांक ३३ आणि ३४ हे क्षेत्र मूळ प्रकल्प मंजुरीच्या कक्षेत येते का? की कोणतीही रीतसर परवानगी न घेता हे सर्व काम गैरमार्गाने सुरू आहे?
या सर्व गंभीर बाबींची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी आणि संबंधितांवर फौजदारी व कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीच्या वतीने बाळासाहेब सपकाळ, ॲड. सिद्धेश पवार आणि परिसरातील नागरिकांनी दिला आहे.



Comments