तारळी पंपस्टोरेज प्रकल्पासंदर्भात स्थानिकांच्या हरकती विचारात घेतल्याशिवाय नवीन मंजुरी देऊ नये; अॅड. सिद्धेश पवार यांची प्रशासनाकडे मागणी.
तारळी पंपस्टोरेज प्रकल्पासंदर्भात स्थानिकांच्या हरकती विचारात घेतल्याशिवाय नवीन मंजुरी देऊ नये; अॅड. सिद्धेश पवार यांची प्रशासनाकडे मागणी.
सातारा, दि.२६ नोव्हेंबर :- रवी वाकडे
तारळी धरण परिसरात अदानी समूहाकडून प्रस्तावित असलेल्या पंपस्टोरेज (PSHP) प्रकल्पाच्या कामकाजात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि बेकायदेशीर उत्खनन होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांच्या हरकती ऐकल्याशिवाय प्रकल्पाला कोणतीही नवीन मंजुरी देऊ नये, अशी मागणी अॅड. सिद्धेश बापुसाहेब पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सातारा जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाचा दाखला
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी अदानी समूहाला पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून आणि आवश्यक परवानग्या न घेता सुरू केलेले उत्खनन व बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा दाखला देत निवेदनात प्रकल्पाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विनापरवाना उत्खनन आणि पर्यावरणाचा ऱ्हास
पाटण तालुक्यातील मौजे सावघर येथील गट क्रमांक ३३ व ३४ मध्ये पर्यावरणीय मंजुरीच्या अटी व कार्यक्षेत्राबाहेर जाऊन उत्खनन करण्यात आल्याचा आरोप निवेदनात केला आहे. याबाबत कंपनीने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे. तारळी धरण परिसर हा सह्याद्रीच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा भाग असल्याने या कामामुळे नैसर्गिक जलस्रोत, वृक्षसंपदा, वन्यजीव आणि ग्रामस्थांच्या जीवनमानावर होणाऱ्या परिणामांची स्वतंत्र चौकशी व्हावी, असेही पवार यांनी नमूद केले आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि स्थानिकांचे नैसर्गिक हक्क धोक्यात घालू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
प्रकल्पाच्या स्थगित केलेल्या कामांना कोणतीही नवीन संमती, पर्यावरणीय परवानगी किंवा प्रशासकीय मान्यता देऊ नये.
स्थानिक नागरिकांच्या लेखी हरकती व आक्षेप ऐकून घेतल्याशिवाय कोणताही पुढील निर्णय घेऊ नये.
सावघर येथील गट क्रमांक ३३ व ३४ मधील विनापरवानगी उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी.
नदीपात्र आणि तारळी धरणाच्या पाणीसाठ्यात झालेल्या प्रदूषणाची तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
Comments
Post a Comment