मनसेचा दणका! तारळी प्रकल्पातील अनधिकृत भराव आणि वृक्षतोडीविरोधात मनसैनिकांचे आक्रमक ठिय्या आंदोलन; 'जोपर्यंत जाब नाही, तोपर्यंत माघार नाही

मनसेचा दणका! तारळी प्रकल्पातील अनधिकृत भराव आणि वृक्षतोडीविरोधात मनसैनिकांचे आक्रमक ठिय्या आंदोलन; 'जोपर्यंत जाब नाही, तोपर्यंत माघार नाही'!
सातारा दि 24:- रवी वाकडे
तारळी धरण प्रकल्प क्षेत्रात अदानी समूहाकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर भराव, रात्रंदिवस ब्लास्टिंग आणि हजारो वृक्षांच्या कत्तलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज प्रकल्पस्थळीच आक्रमक ठिय्या आंदोलन छेडले. "सामान्य शेतकऱ्याला एक कायदा आणि बड्या उद्योगपतींना मोकळे रान, हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही," असा सज्जड दम देत, जोपर्यंत वन आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन कारवाईचा हिशोब देत नाहीत, तोपर्यंत जागचे न हलण्याचा निर्धार मनसैनिकांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्याला दंड आणि कंपनीला अभय का? मनसेचा संतप्त सवाल
धरण आणि वनखात्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे भराव टाकून धरणाच्या पात्रात आडवी भिंत घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी संताप व्यक्त करताना मनसैनिक म्हणाले की, "गरीब शेतकऱ्याने वनखात्याच्या जागेत साधे गवत जरी कापले किंवा एक डंपर वाळू उचलली, तरी हेच प्रशासन तात्काळ पाचपट दंड ठोठावून गुन्हे दाखल करते. 
मग कोणतीही परवानगी न घेता हजारो झाडांची कत्तल करणाऱ्या, रात्रंदिवस ब्लास्टिंग करून लाखो ब्रास उत्खनन करणाऱ्या या कंपनीला कोणताही नियम लागू होत नाही का?" असा थेट सवाल मनसेने प्रशासनाला विचारला आहे.
अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतात?
गेल्या वर्षभरापासून या बेकायदेशीर कामांविरोधात वन विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांना वारंवार लेखी निवेदने देऊनही झोपेचे सोंग घेतले जात आहे. करदात्यांच्या पैशातून पगार घेणारे अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत, या अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी येऊन कारवाईचा पुरावा दाखवावा, अशी आक्रमक मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.
खाकी वर्दीचा आदर, पण भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय नाही!
आंदोलनाची तीव्रता पाहून घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा आणि संबंधित विभागाशी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली: "माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही खाकी वर्दीचा नेहमीच आदर करतो आणि कायदा-सुव्यवस्था बिघडू देणार नाही. मात्र, पर्यावरण आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येथे येऊन अनधिकृत कामांवर काय कारवाई केली याचा लेखी पुरावा दाखवल्याशिवाय मनसैनिक येथून मागे हटणार नाहीत."

Comments