रुद्राक्षा फौंडेशनने ऊसतोड कामगारांच्या मुलांसोबत साजरा केला बालदिन.
तोंडोली कडेगाव,दि 13 :- संकेत महाजन
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त तसेच 'बालदिनाचे' औचित्य साधून तोंडोली येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांसोबत मोठ्या उत्साहात बालदिन साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रुद्राक्षा फौंडेशनच्या वतीने या आपुलकीच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगार दरवर्षी आपल्या कुटुंबासह आणि लहान मुलांसह गावोगावी स्थलांतरित होत असतात. कामाच्या व्यापामुळे आणि सततच्या भटकंतीमुळे या मुलांना अनेकदा सण-उत्सव किंवा बालदिनासारख्या विशेष दिवसांचा आनंद घेता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन, या वंचित घटकातील मुलांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी रुद्राक्षा फौंडेशनने हा विशेष पुढाकार घेतला.
या कार्यक्रमाप्रसंगी रुद्राक्षा फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. अंश श्रीकांत खलिपे, संस्थेच्या सचिव व सेवानिवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ. शोभा खलिपे आणि संस्थेचे मार्गदर्शक व आधारस्तंभ श्री. श्रीकांत खलिपे यांनी ऊसतोड कामगारांच्या वस्तीवर जाऊन मुलांशी संवाद साधला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते मुलांना दैनंदिन वापरासाठी आकर्षक डबे आणि खाऊ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लहान मुलांवरील प्रेमाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, ऊसतोड कामगारांच्या मुलांनीही परिस्थितीवर मात करून शिक्षणाची कास धरावी आणि आपले भविष्य घडवावे, असे आवाहन सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. शोभा खलिपे यांनी केले. तर, समाजातील कष्टकरी आणि दुर्लक्षित घटकांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांच्यासोबत असे दिवस साजरे करणे, हेच रुद्राक्षा फौंडेशनचे मुख्य ध्येय असल्याचे अध्यक्ष ॲड. अंश खलिपे यांनी स्पष्ट केले.
आपल्यासोबत कोणीतरी आपुलकीने बालदिन साजरा करत असल्याचा आनंद ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. आपल्या मुलांचे असे कोडकौतुक झाल्याचे पाहून कामगार पालकही भारावून गेले व त्यांनी संस्थेचे आभार मानले. रुद्राक्षा फौंडेशनच्या या संवेदनशील उपक्रमाचे तोंडोली व संपूर्ण कडेगाव परिसरातील नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment