पाली येथील इंजाई देवी मंदिरात चोरी; ६२ हजारांचा ऐवज लंपास, उंब्रज पोलिसांत गुन्हा दाखल.

पाली येथील इंजाई देवी मंदिरात चोरी; ६२ हजारांचा ऐवज लंपास, उंब्रज पोलिसांत गुन्हा दाखल.
उंब्रज दि 02 :- रवी वाकडे
कराड तालुक्यातील मौजे पाली गावच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध इंजाई देवी मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने डल्ला मारून मंदिरातील चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रोख रकमेसह एकूण ६२,००० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास ते दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ०५:३० वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने इंजाई देवी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील सुमारे अर्धा किलो वजनाचे आणि पानांची नक्षी असलेले चांदीचे किरीट (किंमत रु. ३०,०००/-), सुमारे अर्धा किलो वजनाची व चौकटी बॉक्सवर फुलांची नक्षी असलेली चांदीची पादुका (किंमत रु. ३०,०००/-) आणि मंदिरातील अंदाजे २,००० रुपयांची लाकडी दानपेटी (ज्यामध्ये रोख दक्षिणा रक्कम होती) असा एकूण ६२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लबाडीच्या उद्देशाने चोरून नेला.
याप्रकरणी मंदिराचे पुजारी अमित प्रकाश इंजेकर (वय ३६, रा. पाली, ता. कराड, जि. सातारा) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ४४८/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार पवार (ब.नं. १४५४) यांनी केली असून, या घटनेचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस फौजदार जाधव हे करत आहेत. मंदिरातील या चोरीच्या घटनेमुळे पाली परिसरात खळबळ उडाली असून चोरट्याचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Comments