उसाला योग्य दर मिळावा म्हणून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला कराड बार असोसिएशनचा जाहीर पाठिंबा; आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्यास वकिल मोफत खटले लढणार .


उसाला योग्य दर मिळावा म्हणून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला कराड बार असोसिएशनचा जाहीर पाठिंबा; आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्यास वकिल मोफत खटले लढणार .
कराड दि 15:- रवी वाकडे 
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य व रास्त दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऊस दरवाढ आंदोलनाला कराड बार असोसिएशनने जाहीर पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी वकील संघटना खंबीरपणे पाठीशी असून, आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास कराड बार असोसिएशनचे वकील सदस्य त्यांचे खटले निशुल्क (मोफत) चालवतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. दीपक थोरात यांनी केली आहे.
ऊस उत्पादक शेतकरी हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरी, खते आणि वाहतूक खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेली ऊस दरवाढीची मागणी पूर्णपणे रास्त आहे, अशी भूमिका बार असोसिएशनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली आहे.
सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे-बंगळुरू महामार्गावरील कागल टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
"शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ"
कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. दीपक थोरात म्हणाले, "शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. त्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शासनाने आंदोलकांवर गुन्हे दाखल केले, तर कराड बार असोसिएशनचे वकील सदस्य त्यांच्या केसेस विनामूल्य चालवतील."
या पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती
या जाहीर पाठिंब्याप्रसंगी कराड बार असोसिएशनचे खालील पदाधिकारी आणि वकील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते:
• उपाध्यक्ष: ॲड. अमोल कणसे
• सचिव: ॲड. मयूर एम. माने
• सहसचिव: ॲड. राजवर्धन पाटील
• खजिनदार: ॲड. रोहित माळी
• महिला प्रतिनिधी: ॲड. विद्या मोप्रेकर 
या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर कराड वकील संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते.

Comments