"स्वसंरक्षणासाठी शस्त्र मागा, मी परवाना देण्यास तयार!" पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील .
नागपूर 21:- राजू कदम
राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि त्यांच्यावरील वाढत्या अत्याचाराच्या घटना ऐरणीवर आलेल्या असताना, नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि धाडसी पाऊल उचलले आहे. महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी पुढे येऊन शस्त्र परवान्याची (Arms License) मागणी करावी; अशी मागणी करणाऱ्या पात्र महिलांना आपण स्वतः तात्काळ शस्त्र परवाना देण्यास तयार आहोत, असे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे.
शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे चॅरवेती फाउंडेशनच्या वतीने ‘आदिशक्ती आत्मसंस्कार’ या शस्त्र प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उपस्थित महिला व मुलींना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्तांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
कायद्यानुसार महिलांना स्वसंरक्षणाचा अधिकार
या प्रसंगी बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी नवीन भारतीय न्याय संहितेचा (BNS) दाखला दिला.
ते म्हणाले, "नवीन कायद्यानुसार प्रत्येक महिलेला स्वसंरक्षणाचा मूलभूत अधिकार देण्यात आला आहे. स्वतःच्या जीवाचे रक्षण करणे हा राज्यघटनेने दिलेला अधिकार असून, संकटाच्या वेळी किंवा स्वतःवर जीवघेणा प्रसंग बेतल्यास कायद्याच्या चौकटीत राहून समोरच्या व्यक्तीचा जीव घेण्याचाही अधिकार महिलांना आहे. त्यामुळे महिलांनी आता कोणत्याही भीतीपोटी जगण्याची गरज नाही."
प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य मिळणार
पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, शस्त्र परवाना देण्याची प्रक्रिया ही थेट पोलीस आयुक्तांच्या अधिकारक्षेत्रात येते. त्यामुळे ज्या महिलांना खरोखरच स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्राची गरज वाटते, त्यांनी कोणत्याही भीतीशिवाय कायदेशीर प्रक्रियेनुसार अर्ज सादर करावेत. अशा अर्जांची पडताळणी करून पात्र महिलांना प्रशासन पूर्ण सहकार्य करेल आणि त्यांना शस्त्र परवाना उपलब्ध करून दिला जाईल.
पोलीस आयुक्तांच्या या थेट आणि रोखठोक भूमिकेमुळे गुन्हेगारांवर वचक बसेल, तसेच महिला व मुलींमध्ये सुरक्षेची भावना आणि एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल, अशी आशा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment