रुद्राक्षा फौंडेशनच्या 'माझ्या आयुष्यातली दुर्गा' उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा नात्यांमधील आदराला प्राधान्य.
रुद्राक्षा फौंडेशनच्या 'माझ्या आयुष्यातली दुर्गा' उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा नात्यांमधील आदराला प्राधान्य.
सातारा दि 21:- प्रसाद वाकडे
रुद्राक्षा फौंडेशनच्या 'माझ्या आयुष्यातली दुर्गा' उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा नात्यांमधील आदराला प्राधान्य. देत नागरिकांनी मानले महिलांचे आभार.
नवरात्रीच्या पावन पर्वावर केवळ देवीच्या मूर्तीची पूजा न करता, आपल्या दैनंदिन जीवनात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या जिवंत स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी रुद्राक्षा फौंडेशनच्या वतीने 'माझ्या आयुष्यातली दुर्गा' हा एक अत्यंत कौतुकास्पद आणि वेगळा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला समाजातील विविध स्तरांतून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यात आई, बहीण, पत्नी, कन्या, शिक्षिका, सहकारी किंवा घरकाम करणाऱ्या मावशी, डॉक्टर, नर्स अशा अनेक महिला आपले आयुष्य सुरक्षित आणि सुंदर बनवण्यासाठी सातत्याने कष्ट करत असतात. नवरात्रीच्या निमित्ताने या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
या उपक्रमांतर्गत अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या घरातील किंवा कामाच्या ठिकाणच्या महिलांशी थेट संवाद साधून त्यांना 'थँक्यू' म्हणजेच धन्यवाद म्हटले. यामध्ये अनेकांनी अनोख्या पद्धतीने सहभाग नोंदवला. काहींनी प्रत्यक्ष भेटून भावना व्यक्त केल्या, तर काहींनी नोकरी-व्यवसायानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांमुळे दूर असलेल्या, जसे की गरोदरपणामुळे माहेरी गेलेल्या पत्नीला फोन करून तिच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अगदी हॉस्पिटलसारख्या कठीण आणि चिंताजनक परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांनीही तिथे मदत करणाऱ्या महिला डॉक्टर, परिचारिका आणि नातेवाईक महिलांचे मनातल्या मनात व प्रत्यक्ष आभार मानले. होस्टेल किंवा घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत तिच्या सर्वोच्च स्थानाचा सन्मान केला.
अनेकांनी आपल्या या सुंदर भावना व्हॉट्सॲप मेसेज आणि फोन कॉलच्या माध्यमातून थेट संस्थेपर्यंत पोहोचवल्या. अनेक कुटुंबांमधील महिला कॅमेरा फ्रेंडली नसल्यामुळे किंवा नात्यांमधील हळवेपणा आणि संवाद खाजगी ठेवण्याच्या प्रामाणिक उद्देशाने नागरिकांनी सोशल मीडियासाठी फोटो अथवा व्हिडिओ काढणे टाळले. परंतु, प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा प्रत्यक्ष नात्यांमध्ये निर्माण झालेला आदर आणि आनंद हाच या उपक्रमाचा खरा विजय ठरला आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. अंश शोभा श्रीकांत खलिपे यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश केवळ फोटो गोळा करणे किंवा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणे हा मुळीच नव्हता, तर समाजात आणि प्रत्येक घरात स्त्री शक्तीचा आदर खऱ्या अर्थाने रुजवणं हा होता. महिलांनी कॅमेऱ्यासमोर न येताही, पुरुषांनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेल्या आदरामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आणि आनंद आला, तेच आमच्या संस्थेचे सर्वात मोठे यश आहे. स्त्री शक्तीचा आदर, हाच खरा नवरात्र उत्सव हा सुंदर संदेश देत या अनोख्या उपक्रमाचा अतिशय सकारात्मक वातावरणात समारोप झाला.
Comments
Post a Comment