ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; अजिंक्यतारा कारखान्याला राजू शेट्टींचा ‘काटा बंद’चा इशारा
सातारा दि 06 :- राणी जाधव
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; अजिंक्यतारा कारखान्याला राजू शेट्टींचा ‘काटा बंद’चा इशारा ! शेतकऱ्याच्या घामावर कोट्यवधी कमावणाऱ्या साखर कारखानदारांना आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. ऊसाला कवडीमोल दर देणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात स्वाभिमानी आणि स्वामिनी शेतकरी संघटना आज एकत्र रस्त्यावर उतरल्या.
*आजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा* समोर शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. *५०००रुपये ऊस दर आणि 70 रुपये इथेनॉल दर दिल्याशिवाय एकही चाक हलू देणार नाही,"* असा कडक इशारा यावेळी देण्यात आला.
संघटनेचा आरोप आहे की, खत, मजुरी, औषधं यांचे दर दुप्पट झाले, पण ऊसाचा दर जैसे थेच आहे. साखरेसोबतच बगॅस आणि इथेनॉल मधून कारखाने कोट्यवधी कमावतात, पण शेतकऱ्याला मात्र भिकाऱ्यासारखं वागवलं जातं.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार *राजू शेट्टी* यांनी कारखाना प्रशासनाला भेटून भूमिका मांडली. ते म्हणाले, "साखरेची एमएसपी गेल्या अनेक वर्षांपासून वाढवलेली नाही. पेट्रोलचे दर वाढले तरी इथेनॉलचे दर वाढत नाहीत. केंद्र सरकार बाजारात नवीन साखर आणण्यासाठी कारखाने लवकर सुरू करण्याचा दबाव आणत आहे. शेतकऱ्यांनी आणि कारखानदारांनी तोटा सहन करायचा हे आम्हाला मान्य नाही."
यंदा लवकर ऊस तोड केल्यास रिकव्हरी आणि वजनावर परिणाम होऊन शेतकऱ्याचे एकरी मोठे नुकसान होईल, त्यामुळे रिकव्हरी वाढल्यानंतरच गाळप सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
*पुढे काय?*
दरवाढ जाहीर न झाल्यास जिल्ह्यातील सर्व कारखान्यांसमोर चक्काजाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे, तर अजिंक्यतारा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 12 ऑक्टोबर रोजी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर पुढील दिशा ठरेल.
*कारखाना प्रशासन म्हणते -*
कार्यकारी संचालक शिवाजी मोहिते म्हणाले, सध्या कारखाना बंदच आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल.
Comments
Post a Comment