महिला सुरक्षेसाठी ‘रुद्राक्षा फौंडेशन’ पुण्याच्या रस्त्यावर; पुरुषांच्या संकुचित मानसिकतेवर थेट प्रहार!
महिला सुरक्षेसाठी ‘रुद्राक्षा फौंडेशन’ पुण्याच्या रस्त्यावर; पुरुषांच्या संकुचित मानसिकतेवर थेट प्रहार!
पुणे दि 16 :- रवी वाकडे
नवरात्रीच्या या पावन काळात संपूर्ण देशात आदिशक्तीची, देवीची नऊ रूपे मोठ्या भक्तीभावाने पूजली जात आहेत. मात्र, दुसरीकडे समाजात वावरणाऱ्या जिवंत स्त्रीचा सन्मान आणि तिची सुरक्षा खरंच राखली जातेय का? हाच मोठा प्रश्न उपस्थित करत पुण्यामध्ये एक अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद उपक्रम 'रुद्राक्षा फौंडेशन'ने राबवला आहे. "नवरात्रीमध्ये मंदिरात देवीची पूजा करण्यासोबतच, समाजातील जिवंत स्त्रीचा सन्मान आणि तिची सुरक्षा करणे अधिक गरजेचे आहे," हा व्यापक आणि धारदार संदेश घेऊन ‘रुद्राक्षा फौंडेशन’ची संपूर्ण टीम थेट पुण्याच्या रस्त्यावर उतरली.
पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या वारजे ब्रिज ते कोथरूड रस्त्यावर आणि मुख्य ट्रॅफिक सिग्नलवर संस्थेच्या वतीने पायी जनप्रबोधन करण्यात आले. स्त्रीला केवळ भोगवस्तू किंवा घरापुरते मर्यादित न ठेवता, तिला समाजात एक 'माणूस' म्हणून दर्जा मिळाला पाहिजे, ही जाणीव करून देणारे ८ प्रभावी फलक एका मोठ्या छत्रीला लावून हे फिरते प्रदर्शन रस्त्यावर आणले गेले होते. ही अभिनव आणि विचार करायला लावणारी संकल्पना संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष ॲड.अंश खलिपे यांची होती, तर प्रत्यक्ष रस्त्यावर भर उन्हात उतरून या मोहिमेचे नियोजन पुणे जिल्हाध्यक्ष मा.प्रेम जबडे यांनी अत्यंत कष्टाने केले. या संपूर्ण कार्यात त्यांना सौ.गायत्री जबडे यांचे मोलाचे सहकार्य तर विशेष मार्गदर्शन संस्थेच्या सचिव सौ. शोभा खलिपे यांचे लाभले.
जनजागृती मोहिमेतील
"कायद्याचा वचक हवा, प्रत्येक नराधमाला मृत्युदंडाचा धाक हवा!"
"खेळणं नाही तिचे शरीर आहे, ती कोणाची तरी आई, बहीण, मुलगी आहे!"
"नजरेची वासना बदला, आमचे कपडे बदलण्याआधी दृष्टिकोन बदला!"
"देवीची पूजा तेव्हाच सार्थ, जेव्हा स्त्री सुरक्षित असेल पार्थ!"
"पूजेपेक्षा 'सुरक्षितता' द्या, मला 'माणूस' म्हणून जगू द्या!"
"सुरक्षिततेची हमी द्या, ३६५ दिवस सन्मान द्या!"
"मोकळा श्वास घेऊ द्या, मला सन्मानाने जगू द्या!"
"दाबू नका आमचा आवाज, निर्माण करा भयमुक्त समाज!"
हे महत्त्वाचे व प्रभावी संदेश फलकावर लिहिले होते.
या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांनी केवळ फलक दाखवले नाहीत, तर रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांशी आणि तरुणांशी थेट संवाद साधून "स्त्रीचा सन्मान करा" असे तोंडी जनप्रबोधनही केले. यावेळी समाजात दडलेल्या मानसिकतेचे अत्यंत विदारक अनुभव समोर आले. काही सुजाण नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत छत्रीसोबत फोटो काढले.
'तो' उर्मटपणा आणि समाजाचा आरसा!
प्रबोधन करताना काही पुरुषांनी अत्यंत रागाने आणि उर्मटपणे "हो माहिती आहे आम्हाला स्त्री सन्मान कसा करायचा!" असे म्हणून कार्यकर्त्यांचे ऐकण्यास नकार दिला. केवळ भौतिक गरजा पुरवणे म्हणजे सन्मान नव्हे, तर स्त्रीला एक 'माणूस' म्हणून दर्जा देणे आवश्यक आहे. हाच पुरुषी अहंकार बदलण्यासाठी आमचा संघर्ष सुरू राहील, असा निर्धार संस्थेने केला.
मात्र, दुसरीकडे अनेक पुरुषांनी या विषयाकडे पाहून तोंड वाकडी केली, तर काही जणांनी तर अत्यंत रागाने आणि उर्मटपणे "हो माहिती आहे आम्हाला स्त्री सन्मान कसा करायचा!" असे म्हणून कार्यकर्त्यांचे पुढचे काहीही ऐकून न घेता तिथून पळ काढला. केवळ घरातील भौतिक गरजा पुरवणे किंवा पालनपोषण करणे म्हणजे स्त्रीचा सन्मान नव्हे, तर तिला एक स्वतंत्र माणूस म्हणून जगू देणे आवश्यक आहे. हा पुरुषी अहंकार आणि विकृत मानसिकता बदलण्यासाठी रुद्राक्षा फौंडेशनचा हा संघर्ष अविरत सुरू राहील, असा ठाम निर्धार संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
मोहिमेदरम्यान काही महिलांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी फक्त स्त्रीची नाही, तर घरातील पुरुषांनी स्त्रियांना सन्मान दिला तरच लहान मुले ते बघून शिकतील." तसेच समाजात 'स्त्रीच स्त्रीची शत्रू' ठरत असल्याबद्दलही काहींनी मत व्यक्त केले.
या मोहिमेत मार्गदर्शक सौ. शोभा खलिपे, संस्थापक-अध्यक्ष ॲड. अंश शोभा श्रीकांत खलिपे, पुणे जिल्हाध्यक्ष माननीय प्रेम महावीर जबडे, गायत्री जबडे यांच्यासह प्रियांशी पदुमले, मोहिनी पदुमले आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment