माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा काँग्रेसची बैठक; संघटन विस्ताराला गती.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा काँग्रेसची बैठक; संघटन विस्ताराला गती.
सातारा दि 24 :- रवी वाकडे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीला सदिच्छा भेट देत जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतलेल्या महिला व पुरुष पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले. गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचा ठरावही मांडण्यात आला. निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
बैठकीत उपस्थित सुमारे दहा ते बारा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. जिल्ह्यात काँग्रेस संघटनेचा विस्तार, पक्षाची ताकद वाढवणे, नव्या नेतृत्वाला संधी देणे आणि ब्लॉक तसेच जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करणे, या विषयांवर चर्चा झाली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी काळात सातारा जिल्ह्याचा पुन्हा दौरा करणार असल्याचे सांगितले. या दौऱ्यात विविध ब्लॉक काँग्रेस कमिट्यांना भेटी देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरावर संवाद दौरे आयोजित करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
ब्लॉक स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत संघटन मजबूत करून कार्यकर्त्यांना अधिक बळ देण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानिक प्रश्न समजून घेऊन कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात सत्तापरिवर्तन घडवून आणण्यासाठी काँग्रेस आगामी काळात नियोजनबद्ध पद्धतीने काम करेल, असे सूचक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
बैठकीला जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा राजेघोरपडे, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याची तयारी दिसून आली.
Comments
Post a Comment