नवदुर्गा विशेष: योगविश्वात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या जागतिक विश्वविक्रमवीर डॉ. जान्हवी इंगळे


नवदुर्गा विशेष: योगविश्वात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या जागतिक विश्वविक्रमवीर डॉ. जान्हवी इंगळे.
सातारा दि 16:-रवी वाकडे
नवदुर्गा विशेष: योगविश्वात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या जागतिक विश्वविक्रमवीर डॉ. जान्हवी इंगळे
नवरात्र हा सण केवळ बाह्य उत्सवाचा नसून तो आंतरिक शक्ती, भक्ती आणि आत्मानुभूतीचा पवित्र प्रवास आहे. या नऊ दिवसांत आपण आदिशक्ती माँ दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना करतो. आज 'नवदुर्गा विशेष' निमित्ताने आपण एका अशा आधुनिक नवदुर्गेची यशोगाथा जाणून घेणार आहोत, जिने आपल्या योगसाधनेच्या बळावर केवळ स्वतःचाच नव्हे तर सातारचे, महाराष्ट्राचे आणि संपूर्ण भारताचे नाव जागतिक पातळीवर सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. त्या म्हणजे अनेक जागतिक विश्वविक्रमांना गवसणी घालणाऱ्या योगाचारिणी डॉ. जान्हवी जयप्रकाश इंगळे.आजीच्या सोबतीने सुरू झालेला योगप्रवास जान्हवी यांच्या घरात पूर्वापार मैदानी खेळांचे पोषक वातावरण होते. त्यामुळे लहानपणापासूनच अभ्यासासोबत मैदानी खेळांकडे त्यांचे विशेष लक्ष होते. खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल आणि धावणे अशा स्पर्धांमध्ये त्यांनी नेहमीच उत्तम प्राविण्य मिळवले. 
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या जान्हवी यांच्या आयुष्याला २००६ मध्ये एक वेगळे वळण मिळाले. त्यांच्या आजी टीव्हीवर योगाचे कार्यक्रम पाहायच्या आणि त्यांनीच जान्हवीला योगाचे महत्त्व सांगितले. आजीसोबत टीव्हीवर योग पाहता पाहता जान्हवी यांना योगामध्ये प्रचंड आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी याचे रीतसर शिक्षण घेतले आणि त्यात नैपुण्य मिळवले. आज त्या भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या प्रमाणित योगशिक्षिका आहेत.
'आपल्याला जे येते ते सर्वांना आले पाहिजे' हा उदात्त दृष्टिकोन
ज्ञान हे वाटल्याने वाढते, या विचारावर जान्हवी यांचा गाढा विश्वास आहे. याच भावनेतून त्यांनी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील तब्बल ४०० मुलींना कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये ३ महिने मोफत योगाचे प्रशिक्षण दिले.
 त्यानंतर त्यांनी डॉक्टर, पोलीस, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांसाठी योगवर्ग सुरू केले. 'जान्हवी की योगशाळा' या माध्यमातून त्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांसाठी सकाळ-संध्याकाळ योगाच्या बॅचेस घेतात. यामध्ये मेडिकल योगा, लाफ्टर योगा, प्रॉप्स योगा, पॉवर योगा, हठयोग, अष्टांग योग, अय्यंगार, विन्यास, फेस योगा, चेअर, बॉल आणि स्टिक योगा अशा विविध प्रकारांचे ते मार्गदर्शन करतात. त्यांच्या क्लासमध्ये जॉगिंग, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, प्राणायाम आणि विविध आसनांचा सराव करून घेतला जातो.
सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि मनाला असीम शांती लाभते.
डॉ. जान्हवी इंगळे यांनी आपल्या कठोर साधनेने हे सिद्ध केले आहे की, जेव्हा एक स्त्री दृढनिश्चय करते, तेव्हा ती संपूर्ण जगासमोर एक नवा आदर्श ठेवू शकते. साताऱ्याच्या या लाडक्या कन्येने आणि आधुनिक नवदुर्गेने योगसाधनेच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला आरोग्याचा आणि शक्तीचा संदेश दिला आहे. त्यांच्या या कार्यास आणि कर्तृत्वास आपला सातारा न्यूज परिवाराच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Comments