गांधी जयंतीनिमित्त शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण.
कडेगाव दि 04 :- संकेत महाजन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कडेगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली येथे स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
गांधी जयंतीच्या निमित्ताने ट्रस्टच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिसरात प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबविली. परिसरातील कचरा व अस्वच्छता दूर करून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अधिकाधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष मा.अमरदीप खलिपे, सचिव मा.श्रीकांत खलिपे, सदस्या सौ. पूजा खलिपे, सौ. कविता काटकर, कृष्णा कुरळे, राजेंद्र जाधव (नाना), प्रभास मंडल, उमेश पाटील, मंदार साठे, आयुष काटकर, इंद्रनील खलिपे, स्वराज शिंदे आणि साईश खलिपे यांनी सहभाग घेतला.
महात्मा गांधी यांच्या स्वच्छता व सामाजिक बांधिलकीच्या विचारांना कृतीची जोड देत ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.
जयंतीदिनी केवळ सुट्टी न साजरी करता, प्रत्यक्ष श्रमदान करून ट्रस्टने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भविष्यातही सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Comments
Post a Comment