उंब्रज येथील शिवाजी नगरमध्ये २१ दिवसांच्या नवसाच्या गणपतीचा महाप्रसाद संपन्न; मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराला भाविकांचा मोठा प्रतिसाद.


उंब्रज येथील शिवाजी नगरमध्ये २१ दिवसांच्या नवसाच्या गणपतीचा महाप्रसाद संपन्न; मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराला भाविकांचा मोठा प्रतिसाद.
उंब्रज दि 06 : रवी वाकडे
येथील शिवाजी नगर येथील सुमारे १२५ वर्षांची ऐतिहासिक व धार्मिक परंपरा लाभलेल्या २१ दिवसांच्या नवसाच्या गणपतीचा महाप्रसाद आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
शिवाजी नगर मधील गणेशोत्सव हा त्याच्या पारंपरिक आणि अत्यंत धार्मिक पद्धतीसाठी संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे. सुमारे सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या या नवसाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आज सकाळपासूनच परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अलोट गर्दीमुळे संपूर्ण शिवाजी नगर परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.
केवळ धार्मिक कार्यक्रमच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत यावर्षी देवस्थान ट्रस्ट आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, उंब्रज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपस्थित भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करून योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात आले.
धार्मिक परंपरेला सामाजिक आरोग्याची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे उंब्रज आणि परिसरातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे पदाधिकारी, शिवाजी नगर मधील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments