दारूसाठी पत्नीचा कुऱ्हाडीने खून करणाऱ्या निर्दयी पतीला जन्मठेप; उंब्रज पोलिसांच्या भक्कम तपासाला मोठे यश.
दारूसाठी पत्नीचा कुऱ्हाडीने खून करणाऱ्या निर्दयी पतीला जन्मठेप; उंब्रज पोलिसांच्या भक्कम तपासाला मोठे यश.
कराड दि 26 :- रवी वाकडे
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून स्वतःच्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करणाऱ्या नराधम पतीला कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास नराधमाला अतिरिक्त सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. मे २०१९ मध्ये कराड तालुक्यातील चोरे येथे घडलेल्या या खळबळजनक गुन्ह्याचा उंब्रज पोलिसांनी सखोल व शास्त्रोक्त तपास करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर केल्याने आरोपीला ही कठोर शिक्षा झाली आहे. आनंदा दादू सातपुते (वय ५२, रा. चोरे, ता. कराड) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
या खळबळजनक घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक २० मे २०१९ रोजी मौजे चोरे येथील बेघरवस्तीतील ग्रामपंचायत मिळकत नंबर ९५२ मधील राहत्या घरात ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपी आनंदा सातपुते याने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैसे मागितले होते. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आनंदाने पत्नी सौ. शशिकला यांच्याशी कडाक्याचे भांडण केले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने घरात असलेली कुऱ्हाड घेतली आणि झोपलेल्या अवस्थेत असलेल्या पत्नीच्या डाव्या कानालगत व खालील बाजूस सलग दोन वर्मी घाव घातले. या भीषण हल्ल्यात शशिकला यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत महिलेचा मुलगा आकाश सातपुते (वय २२) याने दिलेल्या फिर्यादीवरून उंब्रज पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन तपासी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी तत्परतेने शोध घेत २४ मे २०१९ रोजी आरोपी आनंदा सातपुते याला अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड व मयताच्या अंगावरील कपडे जप्त करून वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची भक्कम साखळी तयार केली व न्यायालयात परिपूर्ण दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची (सेशन केस क्र. ८७/२०१९) सुनावणी कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संतोष शिंदे यांच्यासमोर पार पडली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले शास्त्रोक्त पुरावे आणि सरकारी वकील एम. व्ही. कुलकर्णी यांनी केलेला भक्कम युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यानुसार २६ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची जाहीर केली.
सदरची उल्लेखनीय कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या खटल्यात न्यायालयीन कामकाजासाठी (पैरवी अधिकारी) पोलीस हवालदार एस. एम. मुळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पी. एच. कार्वेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment