हुतात्मा शाळा संकुलात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात संप्पन्न.


हुतात्मा शाळा संकुलात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात संप्पन्न.
सातारा, दि.20 - प्रा.अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये गुरुवार, दि.15 ऑक्टोबर रोजी डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची  जयंती,विश्व विद्यार्थी दिवस व वृत्तपत्र विक्रेते दिनाचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
यामध्ये शाळा संकुलातील एकूण 84 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून वेगवेगळ्या प्रकारचे असे वृत्तपत्र,कथा,कादंबरी,नाटक,कविता संग्रह ,चरित्र,आत्मचरित्र व काव्य गायन करत प्रेरणादायी पुस्तकांच्या निवडक उताऱ्यांचे वाचन केले.
या कार्यक्रमाचे मनोगत प्रा.अजय शेटे यांनी केले.ते म्हणाले की, डॉ. ए. पी.जे कलाम  यांचे संपूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबदीन कलाम असे असून,त्यांचा  जन्म  15 ऑक्टोबर 1931 रोजी ,तामिळनाडू राज्यातील रामेश्वर या गावात एका मध्यम  वर्गीय कुटुंबात  झाला.सुरुवातीला त्यांनी  सायकल वरून वृत्तपत्रे विकून,आपले शिक्षण पूर्ण केले.त्यांची वैमानिक होण्याची इच्छा होती.त्यासाठी त्यांना दिल्ली येथे परीक्षा व मुलाखत देण्यासाठी जावे लागले.त्यांच्या या प्रवासासाठी त्यांच्या लग्न झालेल्या बहिणीने सासरी न सांगता गुपचूप आपले कानातील सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे दिले होते. डॉ. कलाम यांना आपली  निवड होणारच याची खात्री होती.परंतु  त्यात त्यांची निवड झाली नाही.
त्यामुळे कलाम मोठ्या मानसिक व आर्थिक कचाट्यात सापडले.आता बहिणीला काय सांगायचे ? तसेच माघारी परत गावी न जाता काशी येथे जाऊन गंगा नदीत देह झोकून देऊन,जीवन संपवायचे असा विचार करून ते तेथे पोहोचले आणि निर्मनुष्य ठिकाण शोधू लागले.बराच वेळ फिरल्या नंतर त्यांना संध्याकाळी त्यांना एक निवांत ठिकाण सापडले. थोडा आणखी अंधार व्हावा म्हणून ते तेथे काठावर  विमनस्क अवस्थेत बसून राहिले.
काही वेळाने अचानक  भगवी वस्त्र परिधान केलेल्या  आद्य शंकराचार्य यांचा हात त्यांच्या खांद्यावर पडला.त्यांनी विश्वासात घेऊन ,विचारले  त्यांच्या डोळ्यात पाणी आले व त्यांनी आपली निराश कहाणी सांगितली.त्या बरोबर आद्य शंकराचार्य यांनी त्यांना आपल्या मठात नेवून धीर दिला .तेथील शिष्यांनी त्यांची भोजन व निवासाची सोय करून चांगला पाहुणचार केला. आणि एक संधी जरी गेली तरी निराश होऊ नका असे सांगितले.तिसऱ्या दिवशी त्यांनी बहिणीच्या दागिन्यांचे पैसे तिला माघारी देण्यासाठी डॉ. कलाम यांच्या हातात दिले.तसेच प्रवासाचे पैसे व जेवण बरोबर बांधून देऊन,पुढील काळात तुमच्या जीवनात  यापेक्षाही अतिशय चांगली संधी येणार आहे.त्यासाठी घरी पोहोचल्यावर मन  लावून अभ्यास करा व जीवन ध्येय निश्चित करून प्रयत्न करा.असा आशीर्वाद देऊन परतीच्या प्रवासाला पाठवले.
डॉ. कलाम माघारी आल्या नंतर बहिणी कडे जाऊन,तिचे पैसे माघारी दिले. व घडलेला वृत्तान्त सांगितला. व माघारी येवून अभ्यास व नोकरीच्या संधी शोधू लागले.तीन महिन्यातच भारतीय अवकाश संशोधन केंद्राची प्रशिक्षण व नोकरीची संधी मिळाली. डॉ.कलाम यांनी या संधीचे सोने केले.आणि एक पायलट होण्याचे स्वप्न बाळगणारा तरुण पुढे भारताचा महान संशोधक शास्त्रज्ञ व राष्ट्रपती बनला.आपला पहिला पगार त्यांनी आद्य शंकराचार्य यांच्या आश्रमाला पाठवून देऊन, ऋण निर्देश व्यक्त केला. निवृत्तीच्या काळात त्यांनी ' अग्निपंख ' सारखे अनेक प्रेरणादायी ग्रंथ लिहून, अवकाश संशोधन व शास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या भारत व जगभरातील विद्यार्थ्यांना हयातभर आपल्या अमोघ वक्तृत्वाने मार्गदर्शन केले.'कमवा व शिका आणि साधी राहणी उच्च विचारसरणी ' हि तत्वे त्यांनी आयुष्यभर अंगी बाणवून ,आपला आदर्श निर्माण केला.आयुष्यभर अविवाहित राहून,त्यांनी विद्यार्थ्यांत राहणे पसंत केले.त्यांचे निधन पण एका कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या समोर 27 जुलै 2015 रोजी भाषण करताना झाले.
अशा वृत्तपत्र विकणाऱ्या,वाचन संस्कृती रुजवणाऱ्या आणि जीवनभर विद्यार्थ्यांच्या मध्ये रमणाऱ्या डॉ.कलाम यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.अशा या महान क्षेपणास्त्र व उपग्रह संशोधकास आजच्या या दिवशी आपण विनम्र अभिवादन करून,हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून,साजरा करत आहोत.
या कार्यक्रमासाठी शाळा संकुलाच्या प्राचार्या सौ. बी.एस.माने मॅडम व उप प्राचार्या सौ.एस. पी.जोशी मॅडम यांचे मोठे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.आभार प्रदर्शन सौ. व्ही.व्ही.कोकाटे मॅडम यांनी केले.

Comments