तुकाराम मुंढेंच्या कराड दौऱ्यापूर्वीच ‘अ‍ॅक्शन मोड’; ब्लिंकिट अन् दिवेकर बेकरीवर अन्न व भेसळ विभागाची धडक कारवाई!


तुकाराम मुंढेंच्या कराड दौऱ्यापूर्वीच ‘अ‍ॅक्शन मोड’; ब्लिंकिट अन् दिवेकर बेकरीवर अन्न व भेसळ विभागाची धडक कारवाई!
कराड दि :- रवी वाकडे 
 महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) धडक आणि शिस्तप्रिय आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवारी (१७ ऑक्टोबर) कराड नगर परिषदेच्या शारदीय व्याख्यानमालेसाठी शहरात येणार होते . मात्र, त्यांच्या या दौऱ्याच्या अवघ्या काही तास आधीच सातारा अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग प्रचंड सक्रिय झाला असून प्रशासनाने शहरात मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी सायंकाळी कराडमधील प्रसिद्ध 'ब्लिंकिट' (Blinkit) केंद्र आणि नामांकित 'divekar बेकरी' वर अधिकाऱ्यांनी छापा टाकत धडक कारवाई केल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तुषार शिंगाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कारवाईचे मुख्य मुद्दे:
• ब्लिंकिट (Blinkit): या केंद्रावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. तसेच मालाची डिलिव्हरी करणाऱ्या 'डिलिव्हरी बॉईज'कडे अधिकृत ओळखपत्रे नसल्याचे समोर आल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.

• divekar बेकरी: शहरातील या नामांकित बेकरीमध्येही अन्नसुरक्षेच्या नियमांना हरताळ फासल्याचे समोर आले असून, अस्वच्छतेच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रशासनाने या दोन्ही मोठ्या आस्थापनांवर नेमकी कायदेशीर कारवाई काय केली आणि त्यांना कोणते आदेश दिले, याची अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाच्या धास्तीनेच ही कारवाई झाल्याची जोरदार चर्चा आता संपूर्ण कराड शहरात रंगली आहे.
कराडकरांचा रोखठोक सवाल: कारवाई फक्त 'दौऱ्यापुरतीच' की नियमित?
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी आस्थापनांवर केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा आहे म्हणूनच प्रशासनाला जाग येते का? असा संतप्त सवाल आता कराडकर उपस्थित करत आहेत. ही धडक मोहीम फक्त एका दिवसापुरती मर्यादित न राहता, शहरातील सर्वच खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर नियमितपणे राबवली जाणार का, आणि नियम मोडणाऱ्यांवर सातत्याने कारवाई होणार का? याकडे आता संपूर्ण कराडचे लक्ष लागले आहे.

Comments