उंब्रज कचरा डेपोविरोधात ग्रामस्थांचा आक्रमक ‘रास्ता रोको’; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगितकचऱ्याची आग विझवून डेपो अन्यत्र हलवण्याची आणि नागरी वस्तीजवळ कचरा टाकण्यास कायमची बंदी घालण्याची ग्रामस्थांची ठाम मागणी.


उंब्रज कचरा डेपोविरोधात ग्रामस्थांचा आक्रमक ‘रास्ता रोको’; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित,
कचऱ्याची आग विझवून डेपो अन्यत्र हलवण्याची आणि नागरी वस्तीजवळ कचरा टाकण्यास कायमची बंदी घालण्याची ग्रामस्थांची ठाम मागणी.
उंब्रज दि 12:- रवी वाकडे
येथील कचरा डेपोचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कचरा डेपोमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाने तातडीने व गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागणीसाठी आज स्थानिक ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. आंदोलकांनी कचरा घेऊन जाणारी वाहने अडवून धरली, तसेच डेपोकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद करत जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन केले. प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य रणजीत जाधव, विस्तार अधिकारी स्वामी साहेब आणि ग्रामसेवक समाधान माने यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, केवळ तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास ग्रामस्थांनी स्पष्ट नकार दिला. कचरा डेपोचा प्रश्न वारंवार उभा राहत असूनही त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने, आंदोलकांनी प्रशासनासमोर आपल्या मागण्या आक्रमकपणे मांडल्या.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
• कचरा डेपोला लागलेली भीषण आग तातडीने विझवण्यात यावी.
• नागरी वस्तीच्या शेजारी असलेला हा धोकादायक कचरा डेपो तातडीने अन्यत्र हलवावा.

• यापुढे संबंधित ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकण्यास पूर्णपणे व कायमची बंदी घालण्यात यावी.
कचरा डेपोचा प्रश्न हा केवळ कचरा टाकण्यापुरता मर्यादित नसून, तो परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आरोग्याशी थेट जोडलेला आहे, अशी आग्रही भूमिका ग्रामस्थांनी मांडली. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनस्थळी अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये खडाजंगी चर्चा सुरू असताना, जिल्हा परिषद सदस्य रणजीत जाधव यांनी मध्यस्थी केली. त्यांनी ग्रामस्थांची बाजू सविस्तर ऐकून घेत प्रशासनाच्या वतीने मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले. ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच लेखी पत्राची मागणी लावून धरली होती. अखेर प्रशासनाकडून लेखी पत्र मिळाल्यानंतरच ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले आणि कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित झाले असले, तरी कचरा डेपोचा प्रश्न प्रत्यक्षात कधी मार्गी लागणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची वेळेत अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली असून मागण्या पूर्ण होईपर्यंत या प्रश्नावरील लक्ष कायम राहील, असा इशाराही दिला आहे.
या आंदोलनात रामदास काटवटे, संदीप राठोड, संतोष किरतकर्वे, विजय पवार, सचिन चव्हाण, अशोक गाडे, किसन धावारे, निखिल चव्हाण, आशुतोष धावारे, देशमाने यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments