शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून वडगाव येथे महिलेची आत्महत्या; उंब्रज पोलिसांत गुन्हा दाखल.
उंब्रज दि 06 :- रवी वाकडे
मुलींच्या वादातून शेजाऱ्याने केलेल्या सततच्या शिवीगाळीला आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका ४० वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडगाव (ता. कराड) येथे घडली आहे. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंदना परशुराम विटकर (रा. वडगाव, ता. कराड, मूळ रा. कोकणनगर, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे पती परशुराम काशीनाथ विटकर (वय ४०, रा. वडगाव) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी विजय विष्णू भिसे (रा. वडगाव, ता. कराड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुलींच्या वादातून प्रसंग बेतला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी भाग्यश्री आणि शेजारी राहणारे विजय भिसे यांची मुलगी ओवी यांच्यात वाद झाला होता. या वादाबाबत समजावून सांगण्यासाठी मयत वंदना विटकर या भिसे यांच्या घरी गेल्या होत्या. याचाच राग मनात धरून संशयित आरोपी विजय भिसे याने २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विटकर यांच्या घराजवळ येऊन वंदना यांना अश्लील शिवीगाळ करत मानसिक त्रास दिला.
त्यानंतर त्याच रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वंदना या पुन्हा ओवीच्या आजीला समजावून सांगण्यासाठी गेल्या असता, आरोपी विजय भिसे याने "उद्या तुझी पोरं आणि नवरा गेल्यावर तुला बघतो काय ते" अशी धमकी देऊन पुन्हा शिवीगाळ केली.
मानसिक त्रासाला कंटाळून उचलले पाऊल , आरोपी विजय भिसे याने वारंवार केलेल्या शिवीगाळीमुळे आणि दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून वंदना विटकर यांनी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्यापूर्वी राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेनंतर फिर्यादी परशुराम विटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून उंब्रज पोलिसांनी आरोपी विजय भिसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) आणि ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान) अन्वये गुन्हा (रजि. नं. ४०४/२०२६) दाखल केला आहे.
महिला पोलीस हवालदार विटेकर यांनी हा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करत आहेत.
Comments
Post a Comment