पुणे शिक्षक मतदारसंघ: आरोग्यदूत मंगेश चिवटे ६ ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज; शक्तीप्रदर्शनाची तयारी.
पुणे शिक्षक मतदारसंघ: आरोग्यदूत मंगेश चिवटे ६ ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज; शक्तीप्रदर्शनाची तयारी.
पुणे दि 04 :- रवी वाकडे
पुणे विभागीय शिक्षक विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. 'एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे' प्रमुख आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माजी प्रमुख आरोग्यदूत मा. श्री. मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे (MA.B.Ed) हे पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर, ते मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीमधील जागावाटपात हा मतदारसंघ कोणाकडे जाणार यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. ही जागा भाजपच्या वाट्याला आल्याचे संकेत मिळत असतानाच, शिवसेनेचे (शिंदे गट) मंगेश चिवटे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा आणि अर्ज भरण्याचा निर्धार केला आहे. सूत्रांनुसार, पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून किंवा स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या माध्यमातून ते ही निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
भव्य शक्तीप्रदर्शन आणि उपस्थितीचे आवाहन
६ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरताना पुणे विभागातील शिक्षक आणि समर्थकांच्या उपस्थितीत मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. या नावनोंदणी प्रक्रियेसाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शिक्षक बांधव, हितचिंतक आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंगेश चिवटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न आणि शैक्षणिक क्षेत्रातील अडीअडचणी शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही चिवटे यांनी दिली आहे. त्यांना अनेक शिक्षक संघटना आणि पेन्शनधारक संघटनांनी आधीच जाहीर पाठिंबा दर्शवला असल्याने या निवडणुकीतील चुरस अधिकच वाढली आहे.
Comments
Post a Comment