मालोशी येथे अनुलोम सामाजिक संस्था सातारा आणि सार्वजनिक बाल गणेश मंडळ तर्फे मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मालोशी येथे अनुलोम सामाजिक संस्था सातारा आणि सार्वजनिक बाल गणेश मंडळ तर्फे मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद;
तारळे दि. 26 :- राणी जाधव
मालोशी, ता. पाटण, अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) सातारा, सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ मालोशी आणि छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मालोशी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दुर्गम भागात आणि अत्यंत कमी कालावधीत आयोजित करूनही या शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. या भागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञ वैद्यकीय टीमच्या माध्यमातून विविध तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात 160 पेक्षा जास्त ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करून घेतली असून, तपासणीनंतर त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आली.
शिबिरादरम्यान मुख कर्करोग, स्तन कर्करोग, महिलांचे आरोग्य व स्वच्छता आणि अवयवदान संकल्प अभियान या विषयांवर विशेष जनजागृती सत्र घेण्यात आले. महिला वर्गासाठी स्वतंत्र मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी तारळे क्लस्टरचे अनुलोम मित्र मनोज जाधव यांनी समन्वय साधला. अजित पिंपळे व अतुल पिंपळे यांनी विशेष परिश्रम घेतले. मालोशी उपकेंद्राच्या प्रमुख स्मिता बडे, सरपंच सुशील गुरव, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि मुरुड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथील समाजसेवा अधीक्षक शिवालय वारुळे, जयंत काटकर, अनुलोमचे उपविभाग जनसेवक दिलीप मुळीक आणि पाटण भाग जनसेवक संकेत साळुंखे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील व शेजारील वस्त्यांपर्यंत शिबिराचा निरोप देण्यात आल्याने अनेक गरजू रुग्णांना या उपक्रमाचा थेट फायदा झाला.
Comments
Post a Comment