कराड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन,कराड तालुक्याच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते राकेशराज थोरात पाटील यांची मागणी.


कराड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन,कराड तालुक्याच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते राकेशराज थोरात पाटील यांची मागणी.
कराड, दि. 29 :- रवी वाकडे
कराड तालुक्यात यावर्षी पावसाचे असमान व अपुरे प्रमाण राहिल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई, शेतीपिकांचे नुकसान, जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कराड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राकेशराज थोरात पाटील यांनी कराड तालुक्याच्या वतीने आज, दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अपुरे राहिल्याने तसेच पावसामध्ये मोठे खंड पडल्याने अनेक भागांमध्ये शेतीपिकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. पिकांना आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता याबाबतही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कराड तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राज्य शासनाकडून दुष्काळ व्यवस्थापनाच्या निकषानुसार विविध तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात येत असताना कराड तालुक्याचाही वस्तुनिष्ठ परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील प्रत्यक्ष पर्जन्यमान, पिकांची परिस्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यांचा सविस्तर आढावा घेऊन शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा, अशी मागणीही करण्यात आली.
कराड तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यास शेतकरी व नागरिकांना शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या विविध उपाययोजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन कराड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा राकेशराज थोरात पाटील यांनी व्यक्त केली.


Comments