महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ नियोजन खात्याकडे वर्ग ,डॉ.बसवराज बगले यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शासन निर्णय
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ नियोजन खात्याकडे वर्ग ,डॉ.बसवराज बगले यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शासन निर्णय.
सातारा, दि.17 - प्रा .अजय शेटे
राज्यातील खुल्या प्रवर्गातील लिंगायत समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ नियोजन खात्याकडे वर्ग करणारा शासन निर्णय जाहीर झाला आहे.त्यामुळे लिंगायत समाजातून आनंद व्यक्त होऊन शासनाला धन्यवाद दिले जात आहेत.
महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या तुलनेने,सुमारे १२ ते १५ टक्के असलेल्या खुल्या प्रवर्गातील लिंगायत समाज बांधवांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध संघटनांनी केलेल्या मागणीनुसार सन २০२३ मध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती,मात्र यातील जाचक अटीमुळे ही योजना सफल झाली नाही.म्हणून स्वायत्त दर्जा देऊन राज्य सरकारच्या नियोजन विभागाकडे हे आर्थिक विकास महामंडळ वर्ग करावे अशा मागण्यांचे निवेदन राज्यातील अनेक संघटनांनी सादर केले होते.
या दरम्यान महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले आणि धनंजय महाजन यांनी लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते,वारणा उद्योग समूहाचे प्रमुख व आमदार विनायक कोरे सावकार आणि विधानपरिषद सदस्य आ.बसवराज पाटील यांच्या माध्यमातून सतत प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला होता.इतर आर्थिक विकास महामंडळांच्या तुलनेने लिंगायत समाजाचे आर्थिक स्तर सुधारण्यासाठी आवश्यक ते दाखले देऊन प्रशासनाला या बाबतीत प्रस्ताव तयार करण्याची विनंती करण्यात आली होती.
याबाबत नंतर अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देताच तातडीने शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून ही योजना राबविण्यात अपयश आल्याने कर्ज मंजुरीचे निकष बदलावेत आणि ओबीसी प्रमाणपत्राची अट शिथिल करावी.महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा देऊन खुल्या प्रवर्गातील लिंगायत घटकांसाठी आर्थिक सवलतीच्या विविध योजना स्वतंत्रपणे नियोजन विभागाकडून राबविणे आवश्यक आहे.यासंबधी सबळ पुरावे देऊन सामाजिक न्याय आणि नियोजन विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांशी डॉ.बगले आणि महाजन यांनी चर्चा करून आगामी अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी अशीही मागणी केली होती.या मागणीसाठी दि .२ऑक्टोबर पासून सोलापुरात अन्नत्याग आंदोलनाचा इशारा महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांनी दिला होता.आणि ते मुंबईत आठवडाभर ठाण मांडून बसले होते.
मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी,सहसचिव जायभाये, बाविस्कर आणि विसपुते यांनी यासंबंधी विशेष लक्ष घालून तात्काळ प्रस्ताव तयार केला होता.सदर प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्यानंतर दि.९ सप्टेंबर २০२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे नियोजन विभागाकडे वर्ग करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.
या निर्णयाचे लिंगायत समाज बांधवांमधून स्वागत होत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार विनय कोरे,आमदार बसवराज पाटील मुरूमकर,लिंगायत नेते डॉ.बसवराज बगले आणि धनंजय महाजन यांच्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल समाजातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Comments
Post a Comment