उंब्रज ग्रामपंचायत कार्यालयात राडा; माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण.


उंब्रज ग्रामपंचायत कार्यालयात राडा; माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण.
उंब्रज दि 29 : प्रतिनिधी
माहिती अधिकारांतर्गत प्रथम अपिलाच्या आदेशानुसार माहिती घेण्यासाठी गेलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उंब्रज ग्रामपंचायत कार्यालयात घडली आहे. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात माजी सरपंचासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामदास दिलीप काटवटे (वय ३३, व्यवसाय- हॉटेल, रा. उंब्रज, ता. कराड) यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. प्रथम अपिलाच्या आदेशानुसार माहिती प्राप्त करण्यासाठी ते सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उंब्रज ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक समाधान अंकुश माने यांच्याकडे गेले होते.माहिती घेण्याची ही प्रक्रिया सुरू असताना, फिर्यादी यांचे मित्र खुरशिद खान हे त्यांच्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत होते. याचा राग आल्याने ग्रामपंचायत कर्मचारी ओमकार जाधव आणि माजी सरपंच योगराज उर्फ माणिक शिवाजीराव जाधव यांनी फिर्यादी काटवटे यांना अडवून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी माजी सरपंच योगराज जाधव यांनी फिर्यादी यांना "ये खाटीका तुला काय करायचे ते तु कर" असे म्हणून जाहीरपणे जातीवाचक शिवीगाळ केली.या प्रकारानंतर रामदास काटवटे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी १) ओमकार जाधव (रा. उंब्रज) आणि २) माजी सरपंच योगराज उर्फ माणिक शिवाजीराव जाधव (रा. समर्थ नगर, गोडवाडी रोड, उंब्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.या दोन्ही आरोपींवर अ.जा.ज. अत्याचार प्रतिबंधक सुधारित अधिनियम २०१५ चे कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याची नोंद रात्री २०:२५ वाजता महिला पोलीस हवालदार घाडगे  यांनी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) श्रीमती राजश्री पाटील करत आहेत

Comments