यंदा... शेतकऱ्याचा पेपर लीक झाला...!


यंदा... शेतकऱ्याचा पेपर लीक झाला...!
तारळे दि :- राणी जाधव
यंदा... शेतकऱ्याचा पेपर लीक झाला...!
बापाने कधी शाळा नाही बघितली,
पण पोरांपेक्षा जास्त अभ्यास त्यानेच केलाय.उन्हात, पावसात, थंडीत...
काळ्या मातीच्या फळ्यावर त्याने घामानं अक्षरं गिरवली.
पेरताना हात थरथरले नाहीत, कारण मनात एकच स्वप्न होतं - 
"यंदा पोरांचं फीचं टेन्शन मिटेल, सावकाराचं देणं फिटेल."

पण नियतीला त्याचा अभ्यासच बघवला नाही.

इतरांचे पेपर लीक झाले की न्यूज चॅनल ओरडतात,
याचा पेपर तर आभाळानेच लीक केला.
ढग आले, बरसले नाहीत... आणि बापाचा वर्षभराचा अभ्यास
या सुकलेल्या पानांमध्येच जळून गेला.
हे फक्त पीक नाही सुकलं,
बापाच्या डोळ्यातलं पाणी सुकलंय.
आईच्या ताटातली भाकरी सुकलीय,
आणि लेकराच्या भविष्याचं स्वप्न सुकलंय.

बाप आज शेताच्या बांधावर बसलाय,
हातात काहीच नाही... फक्त रिकाम्या ओंजळीत
त्याच्या नशिबाची राख आहे.

देवा, तू तरी एकदा त्याची वही तपास...
त्याने कधीच कॉपी नाही केली रे,
त्याने आयुष्यभर फक्त इमानदारीनंच पेपर लिहिलाय...!
#दुष्काळ #शेतकरी_राजा 

Comments