शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा भेट,प्रचलित नियमानुसार टप्पावाढ, जुनी पेन्शनसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा; आचारसंहिता संपताच तात्काळ बैठक घेण्याचे आश्वासन.
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा भेट,प्रचलित नियमानुसार टप्पावाढ, जुनी पेन्शनसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा; आचारसंहिता संपताच तात्काळ बैठक घेण्याचे आश्वासन.
मुंबई दि २३ सप्टेंबर :- रवी वाकडे
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील शिक्षक बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शिक्षकांच्या मागण्यांवर शासनस्तरावर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी मंगेश चिवटे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
या भेटीदरम्यान प्रचलित नियमानुसार टप्पावाढ देणे, जुनी पेन्शन योजना, संचमान्यता व त्यातील त्रुटींची पूर्तता, शालार्थ आयडी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता, वैयक्तिक मान्यता, अनुकंपा नियुक्ती, वेतन, भविष्य निर्वाह निधी तसेच विविध प्रलंबित सेवाविषयक प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
विशेषतः पात्र शिक्षक व शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पावाढ मिळावी, यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी मंगेश चिवटे यांनी केली. तसेच शिक्षकांच्या विविध सेवाविषयक प्रश्नांमुळे निर्माण होणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करून पात्र प्रकरणांना वेळेत मान्यता मिळावी, अशीही मागणी करण्यात आली.
जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, शालार्थ आयडी आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक मागण्या या केवळ कागदोपत्री बाबी नसून हजारो शिक्षकांच्या भविष्याशी निगडित प्रश्न आहेत. त्यामुळे संबंधित विभागांची बैठक घेऊन या प्रश्नांवर ठोस आणि सकारात्मक मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, कालपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे सध्या काही प्रशासकीय निर्णय घेण्यावर मर्यादा आहेत. मात्र आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षकांच्या विविध मागण्यांवर तात्काळ बैठक घेऊन सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगेश चिवटे यांना आश्वासित केले.
यावेळी मंगेश चिवटे म्हणाले, “शिक्षक बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रचलित नियमानुसार टप्पावाढ, जुनी पेन्शन, संचमान्यता, शालार्थ आयडी, मान्यता आणि इतर सेवाविषयक प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ बैठक घेऊन सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांसाठीचा हा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील.”
शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी थेट शासनस्तरावर पाठपुरावा आणि प्रश्न मार्गी लागेपर्यंत सातत्याने प्रयत्न, ही भूमिका मंगेश चिवटे यांनी यावेळी स्पष्ट केली.
Comments
Post a Comment