सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत म्हणून सभा गुंडाळली - आमदार मनोजदादा घोरपडे .


सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत म्हणून सभा गुंडाळली - आमदार मनोजदादा घोरपडे 
कराड 20 :- रवी वाकडे
 सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत म्हणून चेअरमन व संचालक मंडळाने सभा गुंडाळली, असा घणाघाती आरोप कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

आमदार घोरपडे म्हणाले, सह्याद्री कारखान्याच्या सभेसाठी मी व आमदार धैर्यशीलदादा कदम हे सभासदांना सोबत घेऊन गेलो होतो. त्यावेळी आम्ही कारखान्यावर ८०० कोटी रुपयांचे कर्ज कसे झाले? सभासदांना मोफत साखर देणार होता ती का देत नाही? ७ रुपये किलोची साखर १५ रुपये दराने का केली? तसेच मयत झालेल्या सभासदांच्या वारस नोंदी का करत नाही? त्यांच्या नावावरील शेअर्स ट्रान्सफर का केले नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची उत्तरे न देता आल्याने सभा गुंडाळण्यात आली.

सभासदांना बोलू न देण्याची परंपरा कायम 
शेतकरी किंवा सभासदांनी प्रश्न विचारण्याचे धाडस केले की सह्याद्रीचे चेअरमन कायमच माईक बंद करतात व सभासदांचा आवाज दाबतात. तसाच प्रकार कालच्या सभेतही झाला. आम्ही बोलायला माइक मागितला असता माईक बंद करण्यात आला व सभासदांना बोलून देण्याची  परंपरा कायम ठेवण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.

*खोटं बोल पण रेटून बोल -*
सहानुभूती मिळवण्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहत असताना विरोधकांनी दंगा केला, असा कांगावा केला जात आहे. त्यांच्याच नावाचा वापर आता सहानुभूतीसाठी करत आहात. वस्तुस्थिती अशी आहे की, आदरांजली वाहून झाल्यानंतर आम्हाला बोलू दिले नाही म्हणून गोंधळ सुरू झाला. तुम्ही जर सभासदांचे म्हणणे ऐकून घेतले असते तर गोंधळाची वेळच आली नसती, असे घोरपडे म्हणाले.

कारखान्याचे एक युनिट दुसऱ्या संस्थेला चालवायला का दिले याचा खुलासा करावा, सभासदांना मोफत साखर द्यावी, सर्व वारस नोंदी कराव्यात आणि ८०० कोटींचे कर्ज कसे फेडणार हे जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

अन्यथा आम्ही सहकार आयुक्त व सहकार मंत्री यांच्याकडे कायदेशीर लढाई लढू. आजपर्यंत शेतकरी सभासदांच्या बाजूने कोणीही आवाज उठवत नव्हते, पण इथून पुढे मी स्वतः सर्व सभासदांसोबत ताकदीने उभा राहणार असून मनमानी कारभाराविरुद्ध कायम आवाज उठवत राहणार आहे, असा इशारा आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिला आहे.
 चौकट= सभासदांना साखर देता म्हणजे उपकार करत नाही 
 सभासदांना शेअरची साखर देता परंतु ती ऊस घातला नाही म्हणून बंद करणे चुकीचे आहे सभासदांनी कारखाना उभारणीसाठी कर्ज काढून शेअरची रक्कम भरलेली आहे त्या शेअरच्या व्याजापोटी आपण सभासदांना साखर देता त्यामुळे ऊस घालण्याचा प्रश्नच येत नाही ज्या सभासदांनी ऊस घातला नाही त्या सभासदांची साखर बंद करता मग ज्या बिगर सभासदांनी ऊस घातला आहे त्याला साखर का देत नाही असा सवाल आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केला.

Comments