पाल (ता. कराड) येथे मारहाणीचा जाब विचारल्यावरून राडा; लोखंडी वस्तू आणि काठीने हल्ला, आठ जणांवर गुन्हा दाखल
पाल (ता. कराड) येथे मारहाणीचा जाब विचारल्यावरून राडा; लोखंडी वस्तू आणि काठीने हल्ला, आठ जणांवर गुन्हा दाखल.
उंब्रज १५ : प्रसाद वाकडे
कराड तालुक्यातील पाल येथे एकाला झालेल्या मारहाणीचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी वस्तू आणि काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी तरुणांची डोकी फोडून दुचाकीचीही मोठी तोडफोड केली आहे. ही घटना सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता पाल येथील वडगाव वेसजवळ घडली. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमकार पवार, सागर देशमुख, धनंजय घाडगे, रामराव पवार यांचा धाकटा मुलगा, आर्यन पवार, संभाजी पवार, बंटी घाडगे आणि सुमित यादव (सर्व रा. पाल, ता. कराड, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांची नावे आहेत. याबाबत प्रमोद बबन शिंदे (वय ४७, व्यवसाय मजुरी, रा. पाल) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रमोद शिंदे व साक्षीदार हे पाल येथील वडगाव वेसजवळील सार्वजनिक रस्त्यावर होते. यावेळी त्यांनी 'ओंकार विठ्ठल पवार आणि उदय प्रवीण वाघ यांना कोणी मारहाण केली?' अशी विचारणा केली. याचा राग मनात धरून आरोपी ओमकार पवार आणि इतर सात जणांनी मिळून फिर्यादी प्रमोद शिंदे, त्यांचा मुलगा पृथ्वीराज, पुतण्या ओंकार सोमनाथ शिंदे, सोमनाथ मल्हारी शिंदे व शुभम भोसले यांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
लोखंडी वस्तू आणि काठीने जीवघेणा हल्ला या राड्यादरम्यान आरोपी सागर देशमुख याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादी प्रमोद शिंदे यांच्या डोक्यात मारले. तर ओमकार पवार याने त्याच्याकडील लोखंडी वस्तूने फिर्यादींचा मुलगा पृथ्वीराज व शुभम यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच धनंजय घाडगे याने काठीने ओंकार सोमनाथ शिंदे यास पाठीवर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी तेथील एका मोटारसायकलची तोडफोड करून तिचे मोठे नुकसान केले.
याप्रकरणी मंगळवारी पहाटे उंब्रज पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ११८(१), ११५(२) आणि ३२४(२) अन्वये वरील आठही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची नोंद पोलीस नाईक डांगरे यांनी केली असून, आरोपींना अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.
पाल गावात एकाच रात्रीत दोन गटांत झालेल्या या हाणामारी आणि परस्परविरोधी तक्रारींमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, उंब्रज पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.


Comments
Post a Comment