गौराई आज ये ग तू सोनं पावली.रूप ते जणू किती साजिरे,हळदी कुंकवाच्या ताटात उठून दिसते जणू गोड गोजिरे.आतुरतेने उभी, अंगणीची तुळस,हसूनी फुलली बहरली,जणू तिच्या स्वागतास.
गौराई आज ये ग तू सोनं पावली.
*रूप ते जणू किती साजिरे,*
*हळदी कुंकवाच्या ताटात*
*उठून दिसते जणू गोड गोजिरे.*
*आतुरतेने उभी, अंगणीची तुळस,*
*हसूनी फुलली बहरली,जणू तिच्या स्वागतास.*
सातारा दि 18 :- रवी वाकडे
*_गौराई आज ये ग तू सोनं पावली._*
सण वरसानं आला गं सजलेल्या अंगणी,
उमा पार्वती घेऊन आले माहेरची पाहुणी.
आली गवर आली आली सोनपावली आली.
चार ओळी गुणगुणत आज डोळ्यासमोर अंगणातील ती पवित्र तुळस डोळ्यासमोर आली. नुकताच कमी झालेला पाऊस अन् ते उतरायला लागलेलं ऊन आणि ताटातले ते सुंदर अशा पिसात नाकात नथ आणि बाजूनी लावलेली एकदानी असलेले मुखवटे आणि डोक्यावर पदर घेऊन प्रेमाने गौराईला घरात आणणारी आई, या साऱ्याची एक विलक्षण ओढ लागून राहते. वाड्यातल्या दगडी फरशीवर कुंकवानी उठवले ले ते हाताचे ते ठसे, त्यात काहीतरी विशिष्ट आहे असं वाटतं राहायचं म्हणजे ...
*रूप ते जणू किती साजिरे,*
*हळदी कुंकवाच्या ताटात*
*उठून दिसते जणू गोड गोजिरे.*
*आतुरतेने उभी, अंगणीची तुळस,*
*हसूनी फुलली बहरली,जणू तिच्या स्वागतास.*
काल सहज आईला फोन केला म्हटलं झाली का ग गौराईंची तयारी हो झाली.आणि मन उगाचच हरवून गेले बालपणात आमच्याकडे आम्ही लहान होतो तेव्हा, गौराईचा सण आला म्हटलं की आम्हा पोरींच्या आनंदाला उधाण आलेलं असायचं.त्यावेळी अगदी साध्या पदधतीने गौरी बसविल्या जायच्या.म्हणजे स्टँड वगैरे असायचे.पण त्या ही आधी अगदी लहान असताना मोठ्या काकी पत्र्याचे गोल डबे वगैरे मांडून त्याच्या भोवतीने काठपदर साडी नेसवून सजावट करून ठेवायची.आणि गौराई बसवली जायची. पण मला आठवते ते आई लोखंडी स्टँड लावून त्याला साडी वगेरे नेसवून गौरी आवाहन दिवशी दुपारी चमच्यानी ता टे
वाजवत वाजवत गौराईचे स्वागत व्हायचे.
"गौराई गौराई कशापायी आली"
"धन धान्य पायी आली."
"गौराई, गौराई कशा पायी आली."
"मुला बाळा पायी आली"
"गौराई' गौराई कशा पायी आली."
"गुरा ढोरा पायी आली"
असे म्हणत म्हणत तुळशी पासून चमच्यानी ताट वाजवत वाजवत तिचे पारंपरिक पद्धतीने गौराईचे स्वागत होत असे.
जिथे गौराई बसवायची तिथे दोन्ही बाजूला फुलोरा ठेवला जायचा.फुलोरा म्हणजे शेतातील काही पिकांची तर काही गवताचा म्हणजे काराळा , भुईमुग , आगडा, हराळी,हायब्रीड, कुंकू गवत, वाकळ गवत इत्यादी पिकांच्या एक एक डहाळी बाजूला ठेवायची. पाना फुलांत पिकात जणू लक्ष्मी आली आहे असे आणि आई बोलती ते अगदी खरे वाटायचे. म्हणजे आई तर आम्हाला हेचं सांगायची. आणि धन धान्याने शेते भरलेली असायची. शेतातील पिके फुलांनी बहरलेली असायची.हिरवी हिरवाई अगदी उठून दिसायाची. म्हणजे जणू घरी लक्ष्मी आल्यासारखे वाटायचे. तसे आत्ता बाहेर गावी आहे तेव्हा ही मी पाहत असते.काहीं ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती ही आहेत. असो अशा प्रकारे गवराईचे पहिल्या दिवशी स्वागत व्हायचे. पहिल्या दिवशी गौराई ला नैवेद्य म्हणून शेपूची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवावयाचा.ती शेपूची भाजी एका विशिष्ठ पद्धतीने केली जायची. म्हणजे त्याच्यात भोपळ्याचे पान,कोवळ्या चवळी आणि चवळीचे पान असे घालून ती भाजी बनवावयाची. आणि त्याच्या सोबतीला ज्वारीची भाकरी असा नैवेद्य पहिल्या दिवशी असतो. अगदी त्या भाजीची तिची तिची अशी एक विशिष्ट अशी एक चव लागायची.ती आजही कधीतरी जीभेवर रेंगाळते.
दुसऱ्या दिवशी गौरी पूजन त्या दिवशी दुपारी नेहमीप्रमाणे पुरणपोळीचा नैवेद्य करायचा.तेव्हा ही मिठाई वगेरे असे काही नव्हते. पण मनापासून तयारी केलेल्या त्या गौरईचे ते रूप डोळ्यात अगदी उठून दिसां यचे. म्हणजे आत्ताही हे सारे करताना घरात आनंदी आनंद असतोच. पण काही पारंपरिक गोष्टी विसरून कसे चालेल. जुन्या नव्या चा मेळ घालतच तर आपण पुढे जात असतो ना! म्हणून आणि आठवण आली म्हणून फक्त माफ करा म्हणजे कोणाच्या भावनांना दुखवावयाचे नाही. नजरेत रूप रूप भरता भरता नि आवराआवर करता करता सायंकाळ केव्हा व्हायची,ते ही कळायचे नाही. तिन्ही सांजेला आई काकडीचे पाच तुकडे पाच विड्याच्या पानावर मांडायची.त्याला 'सुपळुक' असे म्हणायचे. हळदी कुंकू दूध वाहायची. आणि पूजा करायची.तुझ्या पावलांनी आमच्या घरात सुख येऊ दे. अशी प्रार्थना करायची. संध्याकाळी रात्री गौरी जागर असायचा. त्या दिवशी ची एक छोटीशी आठवण सांगते.म्हणजे माझी मोठी ताई, आई ,आणि काकू एक पितळी पातेले घेऊन त्याच्यात मापात बसेल असे आपल्या हायब्रीड किंवा ज्वारीच्या कानासाचे ताट (कडब्याचे सरकाळे) त्या पातेल्यात आडवे अगदी ताठ बसायला हवे असे.थोड्या थोड्या वेळाने पाण्यात हात बुडवून त्या सरकाळा वरून अलगद हात फिरवत राहायचे,काही वेळाने त्यातून खूप सुंदर सुर निघायचा. आणि त्या आवाजावर पूर्वीची काही जुनी गाणी गात तो जागर होत असे.गाणी ही अगदी मार्मिक आणि अर्थपूर्ण अशीच, त्यातली काही आठवतात.
*अंगणी तापते दूध*
*दूध पिवळी शाय*
लेकी गवरी बाय
एवढं जेवूनी जाय.
आता काय करू बाय
शंकर आले,मासुळ्या
द्यायला उशीर झाला.
अंगणी तापते दूध
दुधा पिवळी शाय,
लेकी गवरी बाय
एवढं जेवुनी जाय.
आता काय करू बाय
*शंकर आले जोडवी*
*द्यायला उशीर झाला.*
असे एक एक करत सगळे दागिने घेत घेत गाण्याचा शेवट ,असेच दुसरेही एक गीत आहे.
*रांजा मागली तुळस*
*पाची पानांनी फुलली,*
*जोडव्याच्या भाराणी नि बाई*
*गौराई माझी लवली.*
*रांजा मागली तुळस*
*पाची पानांनी फुलली,*
*कंबर पट्ट्याच्या भाराणी नि बाई,*
*गौराई माझी लवली.*
असे करत करत सगळे दागिने घ्यायचे.
खूप सुंदर सुंदर पारंपरिक गाण्यांनी हा जागर केला जायचा.
*पाटाची हराळी बाई पाण्यानं तुंबली,*
*आमची गौराई इथ का बसली*.
*पैंजनासाठी रुसली म्हणून इथं बसली.*
*नगरच्या सोनारा सांगावा धाडिते*
*पैंजन घडविते अन् गौराईला घालिते गौराईला घालिते.*
*हातात पाटल्या नाकात नथणी कानात बुगड्या*
*केसात वेणी ,बसायला चंदनी पाट अहो बसायला* *चंदनी पाट.*
*आई गौराईचा किती थाट* *माझ्या गौराईचा थाट गं.*
*करांड्यवर करंडा*
*करंड्याव र मोर,*
*माझ्याशी खेळते बघा*
*चंद्राची कोर बाई चंद्राची कोर.*
अशी अनेक गाणी आहेत.
मला वाटते की यातून पूर्वीच्या संस्कृतीचा एक भाग असेल, आणि स्त्रियाना एक नवी ऊर्जा त्यातून लाभत असावी. हे मला तेव्हां ही वाटायचे.आणि आताही तेच वाटते.
या साऱ्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे. आईने प्रेमाने गौराईला दाखविलेला चहाचा नैवेद्य.मला खूप आश्चर्य वाटायचे. किती मनापासून श्रद्धेने आणि प्रेमाने आई ते नात जपायची. म्हणजे अजून हि ते नाते ती जपते. मला माहित नाही.ती श्रध्दा भक्ती पण तिच्या त्या मागच्या भावना त्यातून खूप काही शिकायला मिळाले. असो! म्हणजे पण काळानुसार काही गोष्टी बदलत जातात. त्यामध्ये आता काही आधुनिक गोष्टींचाही समावेश झाला आहे. शेवटी! परिवर्तन ही काळाची गरज आहे.
असे करता करता दोन दिवस कसे निघून जायचे. ते त्या वेळेला ही कळायचे नाही.तिसऱ्या दिवशी मन खूप हळवे व्हायचे.दोन दिवसांचा तो उत्साह डोळ्यात उतरून दोन थेंब होऊन डोळ्यात तरलायचा. लक्ष्मीचे ते रूप डोळ्यात साठवून तिला साखर भात किंवा शेवया चां नैवेद्य दाखवून जड मनाने गौराईला निरोप दिला जायचा.
घरातील ते दोन तीन दिवसाचे वातावरण किती पवित्र उत्साही आणि अगदी आनंदी असायचे.आजही आहे.
याच्यावरून कधी कधी विचार येतो की खरचं आपली संस्कृती खरचं खूप छान आहे.
लिखाणाला पूर्णविराम देता देता, या वर्षीच्या निसर्गाच्या पावसाच्या लहरी पणामुळे गौ राईच्या चरणी एक विनवणी करावीशी वाटते.
*बांधावर ची तृण पाती दवा विण गोठली.*
*मळ्यातली पिकं आज,*
*पावसावीना सुकली,*
*सुखाची चाहूल ग आज डोळ्यात दाटली.*
🌷
*सुख समाधान येऊ दे तुझ्या पाऊली,*
*तुझ्या कृपेची आम्हा सर्वांनावर पडू दे सावली.*
*स्वागत करते तुझे प्रेमाने बसायला देते तुला मी पाट,*
*कोरडा होऊ नये तुझ्या नि आमच्या मायेचा तो काठ.*
*सुकल्या देठा पानावर येऊ दे तेज, होऊ दे नव नव्हेली.*
*गौराई आज माझ्या ये अंगणी तू आता ग सोनं पावली.*
*©सौ.वैशाली चंद्रकांत महाडिक.*
श्री क्षेत्र निनाम - सातारा
संपर्क क्र.-९७६७४३७९२३.
Comments
Post a Comment