तळबीड पोलिसांची संवेदनशीलता; विद्यार्थ्यांना महामार्ग सुरक्षितपणे पार करून दिला
तासवडे, दि. २५ : रवी वाकडे
तळबीड पोलिसांची संवेदनशीलता; विद्यार्थ्यांना महामार्ग सुरक्षितपणे पार करून दिला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तळबीड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
तळबीड पोलीस ठाणे हद्दीतील तासवडे गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सहल तासवडे एमआयडीसी परिसरातील महादेव मंदिर येथे जात होती. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला जावे लागणार असल्याचे तळबीड पोलिसांच्या निदर्शनास आले.
महामार्गावरील वाहनांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन पोलिसांनी कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी तात्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांनी महामार्गावरील वाहने थांबवून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता पार करून दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांची सहल सुरक्षितपणे पुढे रवाना झाली.
पोलिसांच्या या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच योग्य ती खबरदारी घेण्यात आली. पोलिसांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांच्या, विशेषतः लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत दाखविलेली संवेदनशीलता व तत्परता कौतुकास्पद असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.



Comments
Post a Comment