साखर गोड, पण शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ नको ! ऊस उत्पादक शेतकऱ्याला बाय-प्रॉडक्टच्या नफ्यात हिस्सा देण्याची मागणी; एफआरपी वेळेत देण्याबरोबर नफा वाटपाचा कायदा करण्याची गरज.


साखर गोड, पण शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ नको!ऊस उत्पादक शेतकऱ्याला बाय-प्रॉडक्टच्या नफ्यात हिस्सा देण्याची मागणी; एफआरपी वेळेत देण्याबरोबर नफा वाटपाचा कायदा करण्याची गरज.
कराड दि 22 : रवींद्र वाकडे

साखरेचा बाजारभाव वाढत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात मात्र अपेक्षित मोबदला पडत नसल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. साखर, इथेनॉल, बगॅस आणि मळी अशा विविध उपपदार्थांतून साखर कारखान्यांना उत्पन्न मिळत असताना या उत्पन्नात ऊस उत्पादक शेतकऱ्याचा योग्य वाटा का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

साखरेचा दर सुमारे ७० रुपये किलोपर्यंत पोहोचला असून इथेनॉललाही चांगला दर मिळत आहे. बगॅस आणि मळीपासूनही कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. मात्र ऊस उत्पादकाला एफआरपीच्या माध्यमातून मिळणारा मोबदला तुलनेने कमी असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कायम आहेत.

ऊस उत्पादनासाठी वर्षभर मेहनत, पाणी, खत, औषधे आणि मजुरीचा खर्च करूनही शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनातून निर्माण होणाऱ्या विविध उपपदार्थांच्या नफ्यात थेट हिस्सा मिळत नाही. त्यामुळे “ऊसापासून निघणाऱ्या प्रत्येक घटकाला बाजारभाव आहे; मग ऊस उत्पादकाच्या घामाला योग्य भाव का नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

काही कारखान्यांकडून ऊस बिलांच्या देयकाला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो. त्यातून व्याजाचा अतिरिक्त बोजा वाढतो. त्यामुळे एफआरपीची रक्कम वेळेत आणि पूर्णपणे मिळणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

सहकारी साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे असल्याची संकल्पना आहे. मात्र कारखान्यांच्या नफ्यात आणि बाय-प्रॉडक्टच्या उत्पन्नात शेतकऱ्यांचा योग्य सहभाग किती, याबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याची मागणीही पुढे येत आहे.

सरकारने साखर उद्योगातील संपूर्ण उत्पन्नाचा पारदर्शक हिशेब जाहीर करून बाय-प्रॉडक्टमधील नफ्यात ऊस उत्पादकांना योग्य हिस्सा देण्याची व्यवस्था करावी. एफआरपीची १०० टक्के रक्कम वेळेत देण्यासोबतच नफा वाटपाची प्रभावी कायदेशीर तरतूद करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
साखर गोड आहे; पण ज्या शेतकऱ्याच्या घामातून ती तयार होते, त्याच्या जखमेवर मीठ चोळू नका, अशीच आज ऊस उत्पादकांची आर्त हाक आहे

Comments