उंब्रज येथे रामदास काटवटे यांचे आमरण उपोषण; समान न्याय व संबंधित अधिकारी यांच्या कारवाईची मागणी.


उंब्रज येथे रामदास काटवटे यांचे आमरण उपोषण; समान न्याय व संबंधित अधिकारी यांच्या कारवाईची मागणी.
कराड दि :-  रवींद्र वाकडे
अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने आवाज उठवण्यासाठी रामदास दिलीप काटवटे यांनी दि. १० ऑगस्ट २०२६ पासून उंब्रज येथे आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

काटवटे यांनी गट क्रमांक ११७२/७३ तसेच इतर शासकीय जागेवरील सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर समान व निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या ५×५ फूट उपजीविकेच्या दुकानावर कोणतीही नोटीस न देता करण्यात आलेल्या कारवाईची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

उंब्रज बाजारपेठेतील अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमणांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी, आपल्या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे व करण्यात आलेल्या कारवाईच्या प्रमाणित प्रती द्याव्यात, तसेच प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी, अशीही त्यांची मागणी आहे.

ग्रामपंचायत उंब्रज येथील ग्रामसेवक समाधान माने यांनी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ करणे, नागरिकांशी अरेरावी व गैरवर्तन करणे तसेच दुजाभावाची वागणूक देणे, असे आरोपही काटवटे यांनी केले आहेत. या आरोपांची विभागीय चौकशी करून सेवा नियमांनुसार निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“ *एकच मागणी—समान न्याय, पारदर्शक कारवाई!” अशी भूमिका मांडताना काटवटे म्हणाले, “अन्याय थांबवा, न्याय द्या. प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. विभागीय चौकशी करून दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी.”* 
मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, उपोषणस्थळी परिसरातील नागरिकांची गर्दी वाढत असून प्रशासन या आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments