चांगल्या कामासाठी सुबोध भावेंचा मानाचा मुजरा; गोंदवलेकर महाराजांवरील शॉर्ट फिल्मसाठी मानधनाचा केला नकार.
चांगल्या कामासाठी सुबोध भावेंचा मानाचा मुजरा; गोंदवलेकर महाराजांवरील शॉर्ट फिल्मसाठी मानधनाचा केला नकार.
सातारा दि 28 : रवींद्र वाकडे
सोशल मीडिया इन्फ्लुएंझर अथर्व सुदामे याने श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित शॉर्ट फिल्मची निर्मिती केली असून, या चित्रपटात महाराजांची भूमिका अभिनेते सुबोध भावे यांनी साकारली आहे. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी सुबोध भावे यांनी कोणतेही मानधन स्वीकारले नसल्याची माहिती अथर्व सुदामे यांनी सोशल मीडियावरील भावनिक पोस्टद्वारे दिली.
अथर्व सुदामे यांनी सांगितले की, गोंदवलेकर महाराजांवर शॉर्ट फिल्म बनवण्याची इच्छा अनेक दिवसांपासून होती. महाराजांची भूमिका सुबोध भावे यांनी साकारावी, अशीही त्यांची मनापासून इच्छा होती. त्यांनी सुबोध भावे यांना चित्रपटाची पटकथा पाठवली. पटकथा आवडल्यानंतर भावे यांनी कोणताही विलंब न लावता या प्रकल्पासाठी होकार दिला.
शूटिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर सुबोध भावे यांनी अथर्वला फोन करून, “झालं ना सगळं तुझ्या मनासारखं?” अशी आपुलकीने विचारपूस केली. त्यावेळी अथर्व यांनी मानधनाबाबत विचारणा केली असता, भावे हसत म्हणाले, “ह्या गोष्टीचा काही संबंध नाही. अरे, तू काहीतरी चांगलं काम करतोयस... कर. मी आहे.”
या शब्दांनी आपण भारावून गेलो असल्याचे अथर्व यांनी नमूद केले. त्यांच्या मते, त्या क्षणी सुबोध भावे यांच्या शब्दांतच श्री गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद जाणवला.
या शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील दोन आदर्श व्यक्तिमत्त्वे—आराध्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि अभिनेते सुबोध भावे—एकत्र आल्याची भावना व्यक्त करत अथर्व सुदामे यांनी दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment