ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तळबीड पोलिसांचा जनजागृती उपक्रम.

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तळबीड पोलिसांचा जनजागृती उपक्रम.
कराड दि 19 :- रवी वाकडे
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तळबीड पोलिसांचा जनजागृती उपक्रम.
शिरवडे (ता. कराड) येथे तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) रवींद्र भोरे यांनी शिरवडे गावात ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी, त्यांचे कायदेशीर हक्क, सायबर फसवणुकीपासून बचाव तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी तात्काळ संपर्क साधण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

API रवींद्र भोरे यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, बँक खाते, एटीएम कार्ड, ओटीपी किंवा इतर वैयक्तिक आर्थिक माहिती कोणालाही देऊ नये. कोणतीही संशयास्पद घटना, फसवणूक किंवा त्रास होत असल्यास त्वरित तळबीड पोलीस ठाणे अथवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा.

यावेळी पालक व ज्येष्ठ नागरिकांचे भरणपोषण व कल्याण अधिनियम, 2007 अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे हक्क, सन्मानाने जगण्याचा अधिकार, कुटुंबीयांकडून भरणपोषणाचा हक्क तसेच त्यांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. पोलिस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असून कोणतीही अडचण असल्यास निर्धास्तपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन API रवींद्र भोरे यांनी केले.

या जनजागृती कार्यक्रमास शिरवडे गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करून तळबीड पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

Comments