पैशाच्या व्यवहारातून थरार; इंदोली पुलाजवळ तरुणावर पिस्तुलातून गोळीबार एक गंभीर जखमी.

पैशाच्या व्यवहारातून थरार; इंदोली पुलाजवळ तरुणावर पिस्तुलातून गोळीबार एक गंभीर जखमी
उंब्रज, दि. 18 रवींद्र वाकडे
 कराड तालुक्यातील पेरले गावच्या हद्दीत इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर पैशाच्या व्यवहाराच्या वादातून एका तरुणावर पिस्तुलातून दोन राऊंड गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 17) मध्यरात्री घडली. या हल्ल्यात संतोष शंकर घोलप (वय 37) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी जखमी संतोष घोलप (मूळ रा. कालगाव, सध्या उंब्रज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उंब्रज पोलीस ठाण्यात सोमनाथ रमेश चव्हाण (रा. कालगाव) व योगेश सुदाम दीक्षित (रा. मसूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, सोमनाथ चव्हाण याने पैशाचा व्यवहार मिटविण्याच्या बहाण्याने संतोष घोलप यांना फोन करून इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर बोलावले. तेथे आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर सोमनाथ चव्हाण याने त्याच्या एमएच-50-0222 क्रमांकाच्या फॉर्च्युनर कारमधून पिस्तूल काढून संतोष घोलप यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने दोन राऊंड गोळीबार केला. गोळ्या चुकविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या दोन्ही पायांना गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर जखमींची फिर्याद कराड येथील सिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नोंदविण्यात आली. तसेच सातारा जिल्ह्यात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही आरोपींनी पिस्तुलाचा वापर केल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.

Comments