विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक व सामाजिक जनजागृती; तळबीड पोलिसांचे मार्गदर्शन.
कराड (शिरवडे )दि. १६ : रवी वाकडे
तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री रविंद्र भोरे , पोलीस अंमलदार शितल मोहिते, अमोल फले यांनी आज ज्योतिर्लिंग हायस्कूल, शिरवडे येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर व्याख्यान आयोजित केले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पोलीस अंमलदार तसेच इयत्ता ५ वी ते १० वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर, वाहतूक नियमांचे पालन, बालकांचे कायदेशीर हक्क, बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (POCSO) कायदा, बालविवाह, बालमजुरी, व्यसनमुक्ती, महिला व मुलींची सुरक्षा, तसेच आपत्कालीन परिस्थितीत ११२ या हेल्पलाइनचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रभारी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे पालन करणारे, शिस्तप्रिय व जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. मोबाईलचा योग्य वापर करणे, अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवणे, ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहणे, तसेच कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांनी या जनजागृतीपर व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी तळबीड पोलीस ठाण्याचे आभार मानून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.
तळबीड पोलीस ठाण्यामार्फत समाजात कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भविष्यातही अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे वेगवेगळ्या शाळांमध्ये आयोजन करण्यात येणार असले बाबत प्रभारी अधिकारी API रविंद्र भोरे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment