विकसित भारता'साठी रोजगार हमी योजना आता नगरपालिका हद्दीतही राबवा,कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांची रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्याकडे मागणी.


विकसित भारता'साठी रोजगार हमी योजना आता नगरपालिका हद्दीतही राबवा,
कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांची रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्याकडे  मागणी.
सातारा दि ९ जुलै : रवी वाकडे
२०४७ पर्यंत 'विकसित भारत' हे केंद्र व राज्य सरकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजनेची व्याप्ती आता फक्त ग्रामीण भागापुरती मर्यादित न ठेवता ती राज्यातील नगरपालिका हद्दीतही राबवावी, अशी महत्त्वाची आणि दूरगामी मागणी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे शहरी आणि निमशहरी भागातील बेरोजगार मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

"आज ग्रामीण भागाप्रमाणेच नगरपालिका हद्दीतही मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि स्थलांतरित मजुरांची भीषण समस्या निर्माण झाली आहे. या भागातील गरीब आणि गरजू लोकांना देखील रोजगार हमी योजनेचा हक्काचा लाभ मिळणे काळाची गरज आहे. म्हणूनच, 'विकसित भारत' संकल्पना खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचवायची असेल, तर ही योजना तातडीने नगरपालिका हद्दीत लागू करावी, अशी ठोस मागणी मी मंत्री महोदयांकडे केली आहे."

 *मनोजदादा घोरपडे* *(आमदार, कराड उत्तर)*

*मंत्र्यांकडून सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन*
आमदार घोरपडे यांनी मांडलेल्या या मुद्द्याची रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि उपस्थित केंद्रीय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. ग्रामीण भागाप्रमाणेच नगरपालिका आणि निमशहरी भागातील मजुरांना स्थलांतर रोखण्यासाठी या योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत चाचपणी केली जाईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

विधान भवन येथील सभागृहात नुकतीच "रोजगार हमी, विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण कार्यशाळा" अत्यंत उत्साहात पार पडली. या महत्त्वपूर्ण कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससो राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री व राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री मा. भरतशेठ गोगावले, केंद्रीय ग्रामीण विकास विभागाच्या संयुक्त सचिव रोहिणी भाजीभाकरे यांच्यासह राज्यातील विविध मतदारसंघांचे आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत आमदार घोरपडे यांनी नगरपालिका क्षेत्रातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.

कार्यशाळेत बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले की, २०४७ च्या विकसित भारताच्या संकल्पनेसाठी रोजगार हमीच्या माध्यमातून सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत कामे केली जात आहेत. मात्र, आजपर्यंत या योजनेचा लाभ केवळ ग्रामीण भागातील नागरिकांनाच मिळत आला आहे. नगरपालिका क्षेत्रातही रस्ते, नाले सफाई, वृक्षारोपण, तलाव खोलीकरण आणि सार्वजनिक स्वच्छता यांसारखी अनेक कामे रोजगार हमीच्या माध्यमातून सहज करता येऊ शकतात. यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि शासनाचा पैसा देखील योग्य ठिकाणी खर्च होऊन शहरांचा कायापालट होईल, असे मत त्यांनी मांडले.


Comments