शासकीय जागेवरील अतिक्रमणाविरोधात उंब्रज येथे ७ जुलैपासून आमरण उपोषण.

 शासकीय जागेवरील अतिक्रमणा
विरोधात  उंब्रज येथे ७ जुलैपासून आमरण उपोषण.
उंब्रज दि 05 :- रवींद्र वाकडे
 गट क्रमांक 1172 तसेच जिल्हाधिकारी यांच्या मालकीच्या इतर शासकीय जागेवरील कथित अनधिकृत अतिक्रमणे हटविणे, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे आणि माहिती अधिकारांतर्गत मागविलेली माहिती उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांसाठी रामदास दिलीप काटवटे,  यांनी दि. 07 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, उंब्रज येथे शांततापूर्ण बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत जिल्हाधिकारी, सातारा यांना पूर्वसूचना दिली आहे.
काटवटे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गट क्रमांक 1172 तसेच इतर शासकीय जागेवरील कथित अनधिकृत अतिक्रमणाबाबत त्यांनी यापूर्वी अनेक वेळा लेखी अर्ज, तक्रारी तसेच माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत अर्ज सादर केले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस व प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यापूर्वी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर ग्रामपंचायत उंब्रज यांनी कायदेशीर व संविधानिक मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिल्याने आत्मदहनाचा निर्णय पूर्णपणे मागे घेतला असून भारतीय संविधानावर विश्वास ठेवून अहिंसक आणि शांततापूर्ण मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये गट क्रमांक 1172 तसेच जिल्हाधिकारी यांच्या मालकीच्या सर्व शासकीय जागेवरील अनधिकृत अतिक्रमणे तात्काळ हटविणे, संबंधित अतिक्रमणधारकांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करणे, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे, माहिती अधिकार अधिनियमांतर्गत मागविलेली माहिती तातडीने उपलब्ध करून देणे आणि संपूर्ण कारवाईचा लेखी अहवाल देणे यांचा समावेश आहे.

हे आंदोलन भारतीय संविधानातील अनुच्छेद 14, 19(1)(अ), 19(1)(ब) आणि 21 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून पूर्णपणे शांततापूर्ण आणि अहिंसक पद्धतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), प्रांताधिकारी कराड, तहसीलदार कराड, गटविकास अधिकारी पंचायत समिती कराड, पोलीस निरीक्षक उंब्रज पोलीस स्टेशन, आमदार मनोजदादा घोरपडे तसेच सरपंच/प्रशासक ग्रामपंचायत उंब्रज यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Comments