तारळेकरांची 'तारेवरची कसरत'; पुलाच्या रखडलेल्या कामामुळे पावसाळ्याआधीच मृत्यूला आमंत्रण!पालकमंत्र्यांच्या गावातच प्रशासनाचे दुर्लक्ष; शाळकरी मुले, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप.


तारळेकरांची 'तारेवरची कसरत'; पुलाच्या रखडलेल्या कामामुळे पावसाळ्याआधीच मृत्यूला आमंत्रण!
पालकमंत्र्यांच्या गावातच प्रशासनाचे दुर्लक्ष; शाळकरी मुले, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप.
तारळे दि :- राणी जाधव
आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात' अशी काहीशी दयनीय अवस्था सध्या तारळे परिसरातील नागरिकांची झाली आहे. ज्या लोकप्रतिनिधींना लोकांनी डोळे झाकून निवडून दिले, त्यांनीच आता या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. येथील रस्त्यांची झालेली चाळण आणि रखडलेल्या पुलाच्या कामामुळे नागरिकांना रोजच तारेवरची कसरत करावी लागत असून, हा रस्ता आता जणू 'मृत्यूला आमंत्रण' ठरत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तारळे येथे पुलाचे काम सुरू आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदाराने अवघ्या सहा महिन्यांत काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही रस्त्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना पुलाचे काम अजूनही निम्म्याहून अधिक बाकी आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी किमान सहा महिने लागतील, अशी परिस्थिती आहे.

या संथ कारभारामुळे आगामी काळात शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे, तर शेतकरी वर्ग पूर्णपणे अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. नोकरदारांना कामावर जाण्यासाठी लांबचा व त्रासदायक पल्ला गाठावा लागत आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांची काळजी घेणारे पुढारी आता कुठेही सक्रिय दिसत नाहीत. विशेष म्हणजे, हे पालकमंत्र्यांचे गाव असूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही.रखडलेल्या कामामुळे येत्या पावसाळ्यात परिसरातील लोकांचे हाल नक्की काय होणार, या चिंतेने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 'आता जाब कुणाला विचारायचा?' आणि 'तक्रार निवारण करणार कोण?' असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत असून, प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Comments