कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश; उंब्रज येथे अप्पर तहसीलच्या प्रक्रियेला गती .
कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश; उंब्रज येथे अप्पर तहसीलच्या प्रक्रियेला गती
कराड दि 23 :– रवी वाकडे
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ महसुली दृष्ट्या मोठा असल्याने प्रशासकीय सोयीसाठी उंब्रज येथे अप्पर तहसील मंजूर करण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उंब्रज येथे अप्पर तहसील मंजूर झाल्यानंतर आता पुढील कार्यवाहीला गती देण्यात आली आहे.
महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज उंब्रज अप्पर तहसीलसाठी सूचना व हरकती प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले. येत्या १५ दिवसांमध्ये नागरिकांकडून सूचना व हरकती मागवून त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत. या कामासाठी कराडचे उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उंब्रज येथे अप्पर तहसील झाल्यास कराड तालुक्यातील नागरिकांना महसुली कामांसाठी कराडपर्यंत जावे लागणार नाही. जमीन नोंदी, दाखले, सातबारा उतारे यासारखी कामे स्थानिक पातळीवरच जलदगतीने होणार आहेत.
याबत आमदार मनोज दादा घोरपडे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “कराड उत्तर मतदारसंघातील जनतेची ही दीर्घकाळची मागणी होती. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्याने नागरिकांचे हाल कमी होणार आहेत. अप्पर तहसीलच्या उभारणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करू.”
उंब्रज अप्पर तहसीलच्या निर्णयाचे कराड उत्तर मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून, यामुळे महसुली कामांमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे.
Comments
Post a Comment