जी.प. शाळा कोर्टीचा आगळावेगळा उपक्रम : मोबाईलच्या विळख्यातून सोडवत चिमुकल्यांनी घडवला ‘बाहुला-बाहुली विवाहसोहळा’
जी.प. शाळा कोर्टीचा आगळावेगळा उपक्रम : मोबाईलच्या विळख्यातून सोडवत चिमुकल्यांनी घडवला ‘बाहुला-बाहुली विवाहसोहळा’
उंब्रज , दि. २8 :- कुलदीप मोहिते
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना मोबाईलच्या मायाजालापासून दूर ठेवून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना अंकुर फुटावा, यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोर्टी येथे एक अभिनव पर्वणी अवतरली. पारंपरिक ‘समर कॅम्प’च्या चौकटीला छेद देत वर्गशिक्षिका सौ रूपा संदीप जोशी यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘बाहुला-बाहुली विवाहसोहळा’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची नांदी केली. सात दिवस चाललेल्या या सोहळ्यात चिमुकल्यांनी केवळ लग्न लावले नाही, तर व्यवस्थापनाचे धडेही मनावर कोरले.
परीक्षा संपताच मुलांचा ओढा मोबाईलकडे वाढतो, हे ओळखून शिक्षिका जोशी यांनी वर्गातील इयत्ता पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांपुढे एक आव्हान ठेवले – ‘तुम्हालाच बाहुला-बाहुलीचे लग्न लावायचे आहे, तेही अगदी शून्यातून सृष्टी निर्माण करावी तसे!’ मग काय, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर कुतूहलाची लकेर उमटली आणि त्यांनी ती जबाबदारी आनंदाने खांद्यावर घेतली.
*सप्तरंगी सोहळा, सप्तपदींचे व्यवस्थापन*
या अनोख्या विवाहसोहळ्याची सुरुवात नियोजनाच्या बैठकीने झाली. मुली बघण्याचा कार्यक्रम, केळवण, अक्षतांची तयारी, घाणा भरणे, मेहंदी-हळदीचे गीत, गावदेवाला आमंत्रण आणि अखेर वाजतगाजत वरात – अशा एकाहून एक सरस उपक्रमांची रंगीत साखळीच मुलांनी गुंफली. प्रत्येक उपक्रमामागे मुलांचे कौशल्य पणाला लागले. कोणी मांडवसजावटीची धुरा सांभाळली, तर कोणी यजमानपदाची. कोणी हिशोबाच्या वहीत काटेकोर नोंदी ठेवल्या, तर कोणी पाहुण्यांच्या आदरातिथ्याची.
या ‘खेळातील’ खऱ्या लग्नातून मुलांनी वेळेचे महत्त्व, कामांची विभागणी, आर्थिक नियोजन, सांघिक भावना आणि मतभेद विसरून एकदिलाने काम करण्याचा मंत्रच गिरवला. ‘एकमेकांचा आदर करूनच कोणतेही कार्य सिद्धीस जाते’ हा जीवनपाठ त्यांनी कृतीतून शिकला.
*गावकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले*
सात दिवसांच्या अथक परिश्रमानंतर पालकांच्या साक्षीने हा सोहळा दिमाखात पार पडला. लेकीबाळींच्या हातून साकारलेला हा जिवंत देखावा पाहून गावकऱ्यांचे डोळे विस्फारले. ‘ही आमचीच मुलं का?’ असा प्रश्न उपस्थितांना पडावा इतक्या आत्मविश्वासाने चिमुकल्यांनी प्रत्येक जबाबदारी पार पाडली. इवल्याशा हातांनी घडवलेले हे ‘मॅनेजमेंट इव्हेंट’ पाहून सारेच भारावून गेले.
*कौतुकाचा वर्षाव*
या उपक्रमाची सर्व सूत्रे वर्गशिक्षिका रूपा संदीप जोशी यांनी समर्थपणे सांभाळली. मुख्याध्यापिका सुनिता कांबळे, उपशिक्षक सुवर्णा शेजवळ, विजयकुमार देशमुख, आशाताई काळभोर, सविता जाधव व सीमा भोसले श्री राहुल कोळपे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व नियोजनबद्धतेचे भरभरून कौतुक केले.
या सोहळ्यासाठी सूरज यादव, दिलीप थोरात, संतोष थोरात व प्रशांत थोरात यांनी जेवणाची चोख व्यवस्था केली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल यादव यांच्यासह समस्त ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
मोबाईलच्या आभासी दुनियेत हरवणाऱ्या पिढीला मातीशी, संस्कृतीशी व वास्तव कौशल्यांशी जोडणारा हा उपक्रम इतर शाळांनाही नवी दिशा देणारा ठरावा. कोर्टीच्या या चिमुकल्या ‘इव्हेंट मॅनेजर्स’नी दाखवून दिले की, संधी मिळाली तर बालमनातही कल्पनांचे इंद्रधनुष्य फुलते.
Comments
Post a Comment