मोकाट कुत्र्यांचा श्वान दंश आणि इलाज एक गंभीर सामाजिक समस्या. प्रा.अजय शेटे.


मोकाट कुत्र्यांचा श्वान दंश आणि इलाज एक गंभीर सामाजिक समस्या. प्रा.अजय शेटे.
सातारा, दि.24 -
 माजी केंद्रिय मंत्री मनेका गांधी यांनी पशुहत्या विरोधी धोरण आणि कायदा अंमलात आणल्या पासून मोठ्या प्रमाणावर हिंस्त्र पशूंचे रक्षण झाले.पण त्याच बरोबर अशा हिंस्त्र श्वापदांची संख्या पण मोठ्या प्रमाणावर वाढली,आणि साहजिकच त्यांचा मानवी वस्तीत अधिक मोठ्या संख्येने वावर वाढला.त्याच बरोबर पुढे मानव आणि असे हिंस्त्र पशू यांचा जीवघेणा संघर्ष होण्याच्या घटना अनेक वेळा वाढल्या.
यातील महत्वाचा संघर्ष म्हणजे मनुष्य प्राणी व कुत्रा होय.
पूर्वी  तसेच आज पण शेती व घर रक्षणासाठी मानवाचा खरा मित्र म्हणून, कुत्र्याकडे पाहिले जाते.

लहानपणा पासून प्रत्येक व्यक्तीला आवडणारी गोष्ट म्हणजे कुत्रे पाळणे होय.लहानपणी स्वतःचे अथवा गल्लीतील सार्वजनिक कुत्रे अथवा कुत्री किंवा तिची पिल्ले यांचे लाड आणि कोड कौतुक करणे हा अनेक कुटुंबे व त्यांची लहान मुले यांचा आवडीचा छंद होता. हि कुत्री माणसांपेक्षाही अधिक प्रामाणिक राहून,आपल्या मालकावर प्रेम करून,त्याला लळा लावत होती.त्यामुळे घर अथवा शेती मध्ये कुत्रे पाळणे हा अतिशय महत्वाचा असा मानसिक आनंदी असा संवेदनशील विषय होता.मालक , 
पालनकर्ता आणि कुत्रे यांच्या अतिशय हृद्य अशा गोष्टी फार पूर्वीपासून आजही समाजात आनंदाने सांगितल्या जातात आणि त्या  मोठया उत्सुकतेने व चवीने ऐकल्या पण जातात.चाळीतील  भटकी व पाळीव कुत्री हि रात्री -अपरात्री  काही शंका आल्यास स्वतः भुंकून नागरिकांना जाग आणून,भटक्या चोरांनाअटकाव करतात.पण काही वेळा तीच वारंवार झोप मोड करण्यास पण कारणीभूत ठरतात.
वास्तविक शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केला तर मानव ज्या प्रमाणे कुत्र्याला एक प्राणी म्हणून समजतो.तसाच कुत्राही आपल्या मालकाला एक त्याच्या   बरोबर मैत्री करणारा एक प्राणीच समजत असतो.सर्व प्राण्यात कुत्रा हाच अर्थात नर अथवा मादी असो.तो अतिशय बुद्धिमान व विश्वासू असा मानवाचा मित्र मानला गेला आहे.मानवाच्या समतुल्य बुद्धी असणाऱ्या कुत्र्याला म्हणूनच अनेक प्रकारची प्रशिक्षणे देवून,प्रशिक्षित केले जाते.त्याची वास ओळखण्याची क्षमता व  स्मृति तर मानवापेक्षाही अधिक तीव्र असल्याचे जाणवून येते.म्हणूनच लष्कर ,पोलीस यांना मदत करणारे सराईत श्वान  त्या त्या जोखमीच्या विभागात मोठ्या इमाने-इतबारे आपले कार्य चोख पाडत असते.
आज आपणास गावठी कुत्र्या पासून अनेक विदेशी कुत्र्यांचा जाती माहीत होऊ लागल्या आहेत.तसेच त्यांच्या क्षमते नुसार त्या वेगवेगळ्या कामासाठी उपयोगात आणल्या जातात.यामध्ये गावठी कारवाणी पासून,जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन,ग्रेड हाऊंट, पामेरियन, बुलडॉग अशा अनेक जाती लोकप्रिय असलेल्या दिसून येतात.त्यांचा रंग,रूप,आकार, बौद्धिक क्षमता ,आक्रमकता,शर्यत  जिंकण्याची क्षमता यांचा विचार करून,त्यांची पैदास करून,ती पिल्ले मोठ्या महागड्या किमतीत विकणे हा नवीन पिढीचा मोठा सुशोभित व्यवसाय ठरू लागला आहे.
पर्यावरण व पशुधन रक्षण या दृष्टीने हा निश्चितच मोठा कौतुकास्पद प्रयत्न असून,त्यामुळे अनेक प्राणी प्रेमी संघटना समाजात काम करत आहेत. हि अतिशय जमेची अशी चांगली बाजू आहे. शेतात तसेच वाडी - वस्तीवर दोन चांगली कुत्री असणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक बनले आहे .पण त्याच बरोबर या बाबत काही वाईट बाबींचा अनुभव हि समाजात येताना दिसतो.
या मध्ये आज सर्वात मोठी समस्या हि भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांची आहे.
सुरुवातीला अनेक प्राणी प्रेमी हौसेने कुत्री पाळतात.पण कालांतराने त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन,त्याच कुत्र्याचे रूपांतर चाळीतील सार्वजनिक कुत्रे म्हणून होऊन जाते. पाळणारा मालक एक आणि त्यांना सांभाळणारी चाळीतील माणसे असे जणू समीकरणच बनून जाते.पुढे याच कुत्रा अथवा कुत्रीची पुढची पिढी वाढत जाऊन,चाळीतील व पर्यायाने गावातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत जाते .तसेच ती मोठ्या टोळक्याने सर्वत्र फिरत राहतात.प्रजनन काळात तर त्यांचा गंध दूरवर पसरून,दुर वरची मळ्यातील अथवा वाडी - वस्ती वरील कुत्रीही एकमेकांना शोधत येतात.अनेक वेळा त्यांच्यात अथवा इतर टोळीतील कुत्री यांची जोरदार भांडणे होऊन,अनेक कुत्री जीवघेणी जखमी होतात अथवा दुर्धर अशा आजाराला सामोरे जात.समाजात रोगराई पसरवतात.पूर्वी अशा कुत्र्यांना ऐच्छिक मरण देण्यासाठी जनावराच्या दवाखान्यात गोळ्या मिळत असत.पण आता मात्र त्या मिळत नसून,त्यावर पूर्ण बंदी असलेली दिसते.
त्याच बरोबर या कुत्र्यांच्या टोळ्या चौकाचौकात ठाण मांडून बसलेल्या असतात.नागरीकरण वाढल्यामुळे लोकांनी  व व्यापाऱ्यांनी फेकून दिलेल्या उघड्या शिळ्या शाकाहारी - मांसाहारी अन्न  कचऱ्यावर त्यांची गुजराण होते आणि मग त्यांची पैदास वाढतच जाते .दिवसा उजेडी अथवा रात्री अपरात्री ती येणाऱ्या - जाणाऱ्या व्यक्तीवर भुंकतात,प्रसंगी चावा घेण्यासाठी हल्ला करतात.दुचाकी वाहनांचा पाठलाग करून,अपघातास कारणीभूत ठरतात.पहाटे फिरायला जाणारे ज्येष्ठ स्त्री - पुरुष , नागरिक,शाळा - क्लास ला जाणारी मुले - मुली यांच्यासाठी तर अशी कुत्री आज खूप मोठी डोकेदुखी बनून गेली आहे.त्यामुळे पालकांना त्यांच्या बरोबर जाणे - येणे आवश्यक बनले आहे.परंतु टोळीतील कुत्री हि अनेक व्यक्तीवर सुद्धा एकाच वेळी हल्ला करू शकतात.भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरताना पाळीव लहान कुत्री घराबाहेर बांधू नयेत.त्यांना घरात सुरक्षित ठेवावे.त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो.पाळीव कुत्र्यांना सुरक्षेसाठी चामडी जाड पट्टा गळ्यात व डोक्यावर येईल असा तयार करून घेवून बांधावा.कारण त्यांच्यावर इतर कुत्र्यांकडून हल्ला झाल्यास ते  गंभीर जखमी होऊन मृत होण्याची शक्यता असते.जेथे त्यांना स्वतःला जिभेने चाटता येते तेथील जखम बरी होते.पण जिथे त्यांची जीभ पोहोचू शकत नाही.तेथील जखम संसर्ग होऊन बळावू शकते.म्हणून तातडीने त्यांना पशू दवाखाना अथवा मेडिकल स्टोअर्स मधून औषधे आणून उपचार करावा.त्यांची नेहमी स्वच्छता ठेवावी.कारण त्यांचा संसर्ग  घरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना होऊ शकतो. पाळीव कुत्र्यांना हिंसक प्रशिक्षण देवू नये.शिवाय ते  एक प्राणी आहे हे समजून घेवून त्याच्याशी सर्वांनी एक हात अंतर ठेवूनच आपले सुरक्षित वर्तन करावे.पिसाळलेला अथवा हिंस्त्र कुत्रा चावल्यानंतर योग्य उपचार न झाल्यास अथवा नजरचुकीने दुर्लक्ष झाल्यास अथवा हेतुपूर्वक निष्काळजीपणा  दाखवल्यास काही दिवसात रुग्ण हा रेबीज जंतू संसर्ग आजाराने घेरला,जावून,त्याला पाण्याची भीती वाटू लागते व त्याचे वर्तन कुत्र्यासारखे चावणारे बनते. यात त्याचा संपर्क येणारा व व त्याचा  अकाल मृत्यू अटळ असतो.यावर शासनाने निर्बीजीकरण प्रक्रिया राबवून,सर्वसामान्य नागरिकांना स्व - सुरक्षेचा दिलासा देणे अत्यंत आवश्यक आहे.भटकी कुत्री व त्यांचे हल्ले हि आज शासन व कोर्ट दरबारी विचार मंथन ठरणारी गोष्ट बनली आहे.यासाठी प्रगत शहरी भागात परदेशात राबविण्यात येणाऱ्या काही उपाय योजना राबविणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
यामध्ये कुत्र्यांच्या सर्व प्रकारच्या उपद्रवास मालकास जबाबदार धरले जाते.मालक व पाळीव श्वान व प्राणी यांची रितसर नोंद महानगर पालिके पासून ग्राम पंचायत पर्यंत करणे कायदेशीर करणे.स्वीडन मध्ये पाळीव प्राण्याचा सांभाळणे अशक्य झाल्यावर सदर प्राणी शासकीय यंत्रणेद्वारे हिंस्त्र पशुंसाठी खाद्य म्हणून , प्राणी संग्रहालय  अथवा अभयारण्य व्यवस्थेकडे सुपूर्द केले जातात.आपल्याकडील भटकी कुत्री पण  पकडून व कोंडवड्यात गोळा करून ,एक एक करून बिबट्या  प्रवण क्षेत्रात,त्यांच्या सारख्याच सारख्या हिंस्त्र प्राण्यांचे खाद्य म्हणून,जंगलात कमरेला लोखंडी साखळी बांधून ठेवता येतात का अथवा  एक एक करून सोडता येतात का ? याचे नियोजन करावे लागेल.जेणे करून, हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत येवून,त्यांच्या पाळीव जनावरे अथवा स्वतःवर हल्ला होण्याचे प्रमाण कमी होईल.जखमी कुत्र्याला ऐच्छिक मरण देणारी औषधे कायदेशीर प्रक्रियेने उपलब्ध व्हावीत.तसेच मृत जनावरांची गावाबाहेर नेवून  विल्हेवाट लावणारी यंत्रणा अधिक सक्षम व्हावी. कुत्रा चावल्यानंतर अत्यावश्यक असणारी रेबीज प्रतिबंधक औषधे सर्व दवाखान्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत. पाळीव कुत्र्यांना मालकांनी रेबीज प्रतिबंधक औषधे दिली आहेत का ? याचा आढावा घेतला जावा.उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ टाकण्यास बंदी घालावी.लहान मुले  महिला व नागरिक यांनी एकटे बाहेर पडू नये. सर्वांनी जवळ चांगली दणकट लाठी - काठी ठेवावी.कुत्री आज सार्वजनिक भांडणाचे एक मोठे कारण ठरत चालली आहेत. रानोमाळी लहान मुक्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी कुत्र्यांचा वापर करण्यात येत आहे.त्याला प्रतिबंध करून,पर्यावरण साखळी वाचवावी .
शासन दरबारी या समस्येचा अधिक गांभीर्याने विचार होऊन, अशा भटक्या कुत्र्यांचा तातडीने कसा बंदोबस्त करता येईल व सर्व सामान्य नागरिक सुरक्षित जीवन कसे जगू शकेल.याचा त्वरित विचार झाला पाहिजे.अशी आग्रही मागणी सर्व नागरिक शासन दरबारी करत आहेत.


Comments