गोपाल नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पावन भूमी श्री क्षेत्र भोसलेवाडी , उंब्रज.

 


 गोपाल नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पावन भूमी श्री क्षेत्र भोसलेवाडी उंब्रज.



उंब्रज दि.07  -  रविंद्र वाकडे 

उंब्रज, ता.कराड, जि.सातारा मधील कृष्णा व तारळी नद्यांच्या  संगमावर व पुणे - बेंगलोर हायवे लगत वसलेले भोसलेवाडी हे पवित्र क्षेत्र आहे .या गावातील गोपालनाथ मंदिर अतिशय प्रसिद्ध असून,त्याला मध्ययुगीन महात्म्य आहे. गावाच्या प्रवेश द्वारावरच भव्य अशी स्वागत कमान असून हि कमान श्री विशाल संताजी भोसले यांनी उभारली आहे ,त्याच बरोबर श्री गोपाल नाथ मंदिराचे  पुढे असणारी महाद्वार कमान हि नाथभक्त श्री.संदीप /सचिन संभाजी भोसले यांनी नाथभक्त कै . संभाजी भोसले तात्या यांच्या स्मृती निमित्ताने उभारली आहे. 



पुढे गोपाल नाथांचे मंदिर असून , प्रांगणात नाथभक्त श्री.जनार्दन हिंदुराव भोसले यांनी पेव्हर्स ब्लॉक बसविले आहेत. मुख्य गर्भगृहात श्री गोपालनाथ,श्रीमंत गणोजी राजे व सगुणामाता यांच्या सुशोभित मूर्ती या गावातीलच मूर्तीकार श्री.किरण भानुदास भोसले या शिल्पकाराने घडविल्या आहे.

भोसलेवाडीचे संस्थापक गणोजी भोसले हे छत्रपतींच्या ' डंका ' निशाण्याचे मानकरी होते.त्यांचा पराक्रम पाहून, एक दिवस छ.शाहू महाराज यांनी त्यांना बोलावले व योग्य ती देणगी मागण्यास सांगितले.त्यावर , ' महाराज ! आयुष्यातील  गरजा भागतीलअसे दान द्या ' असे म्हटले.महाराजांनी 'हो' म्हणताच गणोजी  नाथांकडे गेले. नाथांनी भ्रमंतीत एखादी जमीन हेरली असेल असे त्यांना  वाटले. सर्व मनोगत नाथांना सांगितले. नाथ त्यांना कृष्णा व तारळी नद्यांच्या संगमावरील रम्य व सुपीक भूमी गोपाळवाडी उर्फ भोसले वाडी येथे घेवून आले व छ.शाहूंनी इनाम दिलेल्या जमिनीवर या गावाची स्थापना केली.हे कार्य नाथांच्या उपस्थितीत पार पडले.नाथांनी  दाखवलेल्या जागी गणोजींनी त्यांचे आसन स्थापन केले. नाथ त्यावर आसनस्थ झाले. 


                                      

समोरच  नाथांनी खैराच्या लाकडाची ' मेठ ' रोवली व ती शेषा च्या मस्तका पर्यंत गेली असून,पृथ्वीच्या अंतापर्यंत येथे भोसले घराण्याचा वंश चालत राहील .असा आशीर्वाद दिला.स्थापनेनंतर  तीन वर्षांनी त्यांनी या आसनावर बसून ' शिरोमणी हा ग्रंथ लिहिला. यात भोसलेवाडीचे मूळ नाव गोपाळवाडी आहे. ग्रंथाची समाप्ती एकनाथ षष्ठी ला झाली म्हणून, ' एकनाथ षष्ठी ' चा उत्सव दरसाल करण्याची आज्ञा त्यांनी केली.त्यानुसार उत्सव सुरू झाला.ते साल होते ई. स.1744.गणोजी भोसले घराणे इथे स्थिरावले. वंशवेल वाढू लागला. तीन बायका व मानाजी पुत्रासह पहिली तीन वर्षे आनंदात गेली. गोपाळ नाथांचे प्रदिर्घ वास्तव्य येथे राहिले.एकदा नाथ गणोजीस म्हणाले,तुला उपदेश केला तेव्हा तू म्हणाला होतास की, तुझे सारे 'तन - मन - धन ' तू आम्हाला अर्पण केले आहेस.मग आता हे जे धन - द्रव्य आहे त्याचा कर्ता कोण ? परमशिष्य गणोजी नम्र पणे म्हणाले,नाथांशिवाय दुसरे कोणी मी जाणत नाही.मग नाथांनी सेवक बोलावले व  जामदारखान्याची मोजणी केली. ते सुमारे एक लक्ष भरले. या द्रव्याने नाथांनी  अन्नदान केले.ब्राम्हण,गोसावी, अकिंचन त्यांचेसाठी भंडारा चालू केला.हा भंडारा तीन वर्षे चालला व  ' एकनाथ षष्ठी ' चा उत्सव आला.आनंदी वातावरणात ब्राम्हण भोजन चालू होते. नाथ पंक्तीत फिरत असताना त्यांच्या लक्षात आले की,तूप कमी पडत आहे.म्हणून त्यांनी गणोजीस तूप आणण्यास सांगितले.ते वाडयाकडे आले तर भयंकर प्रकार घडला होता. मुलगा मानाजी सर्पदंशाने मरण पावला होता. रडारड सुरू होती. ही बातमी बाहेर समजली तर ब्राम्हण भोजन सोडतील . पंगती न जेवताच उठतील.तेव्हा मृत मानाजीला लोकरीच्या जिनात गुंडाळून ठेवून, ते तूप घेवून जेवणाच्या मंडपात आले.


तोच नाथांनी संकल्प मानाजीच्या हस्ते सोडायचा म्हणून त्याला बोलविण्यास सांगितले. गणोजी मोठ्या काळजीत पडला. मुलगा गावास गेला आहे.असे सांगितले.नाथांनी ते न ऐकता ,तो घरीच आहे तर खोटे कशाला बोलता असे म्हटले व एका शिष्यास हाक मारायला सांगितली.तसा मानाजी धावतच  आला व नाथांच्या समोर उभा राहिला. नाथांनी त्याच्या हस्ते संकल्प सोडून, तुपासह सर्वांना जेवू घातले.अशा प्रकारे नाथांनी आपले  सामर्थ्य दाखवून मृत मानाजीस जिवंत केले.मानाजी जिवंत झाला तेव्हा नाथांनी आपला उजवा डोळा मिटून घेतला.सात दिवस तो तसाच झाकून होता.हे गणोजीच्या लक्षात आले.त्याने नाथांना विचारले.तेव्हा म्हणाले,मानाजीस उठवले तेव्हा आमचा उजवा नेत्र गेला.तेव्हा आता मानाजी  हवा असेल तर डोळा मिळणार नाही आणि डोळा उघडला तर मानाजी जगणार नाही.यातून एकाची निवड तू कर.गणोजीम्हणाले ,मला नेत्र हवा पुत्र नको.नाथांनी  नेत्र उघडताच मानाजी शांत झाला.त्यांची समाधी नाथांच्या येथील आसना समोरच  आहे.असे होते गणोजी परम नाथभक्त ,गुरुभक्त आणि धन्य ती माऊली सगुनामाता. पुढे  गोपाळनाथ हे सातारा जिल्ह्यात  कोरेगाव तालुक्यातील  ' त्रिपुटी गावी आले.येथे  ई. स.1766 मध्ये संजीवन समाधी घेतली. नाथांचा जन्म श्रावण वद्य अष्टमी ,गोकुळाष्टमी होय.आणि हाच समाधीचा दिवस .म्हणून त्या दिवसापासून ते श्रावण वद्य अमावस्या अखेर आठवडा भर मंदिरात नाथांचा पुण्यतिथी महोत्सव  साजरा होतो.यामध्ये नित्य पूजा,रुद्राभिषेक,भजन,किर्तन व महाप्रसाद होतो.

 

                  

या सोहळ्यासाठी भोसलेवाडीचा मान मोठा आहे.तेथील ध्वज नाथभक्त मिरवत आणून नाथांच्या समाधीला प्रदक्षिणा घालतात व तो समाधी मंदिरासमोर उभारला जातो.हा मान मोठा आहे.तसेचअनेक नाथ भक्तांचे वास्तव्य त्रिपुटी ' मध्ये असते.ही परंपरा अखंडपणे चालू आहे.आणि या पुढे ही चालु राहील,दि 13 रोजी सकाळी  9 वाजाता त्रिपुटी येथील मठाधिपती श्री गुरुनाथ महाराज घोलप यांचे शुभ हस्ते ध्वज पूजन करण्यात येऊन उत्सवाची सुरवात केली जाते ,या नंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले  जाते , सायंकाळी  वांग आणि खीर यांचा महा प्रसाद करण्यात येतो , या नंतर दि,14 रोजी सकाळी श्री नाथ लीला या ग्रंथाचे पारायण ,दुपारी तारळी नदीच्या पाणवठ्यावरुन  मंदिरापर्यंत साष्टांग दंडवत   केले जाते ,या नंतर शेतकरी मेंढपाळ यांची शेळ्या मेंड्या सोबत मंदिर प्रदक्षणा होते यानंतर दही  हंडी गोपाळ काला चा कार्यक्रम होता श्री च्या पादुकांची ग्राम प्रदक्षणाव पालखी सोहळा संपन्न होतो आणि सायंकाळी वांग भाकरीचा महाप्रसादा आयोजित केला जातो,दि 15 रोजी सकाळी 10 वाजता काल्याचे किर्तन आणि12.30 वाजता महाआरती आणि प्रसाद वाटप आणि महा प्रसादाचे आयोजन केले जाते तरी सर्व भाविकांनी  उपस्थित राहावे असे आवाहन भोसलेवाडी ग्रामस्थांनी  आणि श्री गोपालनाथ  देवस्थान ट्रस्ट यांचे वतीने करण्यात आले आहे.

 


                                मानाजी गणोजीराजे  भोसले यांची समाधी 

 यंदाचे हे वर्ष 279 वे असून,यावेळीही उस्फुर्तपणे कार्यक्रम होणार आहे.गोपाळनाथ रचित 'वेदांत शिरोमणी ' या ग्रंथात  9201ओव्या आहेत.तर गणोजी भोसले यांचे दुसरे पुत्र आबाजी भोसले यांनी आपल्या वडिलांचे चरित्र सर्वांना समजावे म्हणून शाहीर श्री हैबती बाबा पुसेसावळीकर यांच्या करवी 'श्री नाथ लिला विलास ' हा दुसरा ग्रंथ लिहून घेतला आहे. दोन्हीही ग्रंथ नाथ भक्तांच्या हृदयाचा गाभा आहेत. दोन्ही देवस्थानचा कारभार जुनी ट्रस्ट नवीन ट्रस्ट तर्फे चालवला जातो.,त्यातप्रगती होत आहे.भोसले वाडीच्या स्थापनेपूर्वी कृष्णा - तारळीच्या संगमावरील या गावास महसुली नाव ' कोर्टी ' असे होते. दि.6.6.1976 रोजी तारळी नदीला आलेल्या महापुरामध्ये हे गाव पाण्याखाली गेले. मा.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नाने पुनर्वसन झाले.पुढे अनेक शेतीपूरक धंदे उभारल्यामुळे या गावाचे नाव महाराष्ट्रभर पसरले.

येथे वेळोवेळी नवे उपक्रम होत आहेत.त्यासाठी देणगी दानशूर भक्त दान करतात.त्यासाठी  कॅनरा बँक, कोर्टी येथे बँक खाते उघडले असून,त्याचा क्र.54152200009393 असा आहे व IFSC कोड -CNRB 0015415 असा आहे. भक्तांनी देणगी रक्कम या खात्यावर पाठवावी.असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

!! श्री परब्रम्ह सद्गुरू गोपाळनाथ महाराज की जय !!.**

संकलन रविंद वाकडे उंब्रज Mob.9405099707 / 9370728707 आणि लेखन प्रा.अजय शेटे वडूज Mob . 98235 40239

विशेष आभार श्री गोपालनाथ देवस्थान ट्रस्ट, आणि ग्रामस्थ भोसलेवाडी, उंब्रज

 

Comments