शक्तीपीठ महामार्गाला खटाव तालुक्यातील औंध,पुसेगाव व
वडूज, मायणी हि ठिकाणे जोडली जावीत.
सातारा, दि.8 - प्रा.अजय शेटे.
महाराष्ट्र सरकारचा बहुचर्चित वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी हा 802 किमी चा शक्तीपीठ महामार्ग 32 जिल्ह्यातील 39 तालुके व 370 गावे या मधून जाणार आहे.या महामार्गाने तुळजापूर,माहूर ते कोल्हापूरची अंबाबाई ,नृसिंहवाडी, आदमापुर
अशी एकूण 18 दैवी धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास केवळ आठ तासात पूर्ण होणार आहे.
या महामार्गाची सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मूळ रचना बदलली जाणार आहे.नव्या रचने नुसार यात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर व गोंदवले हि तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.त्या प्रमाणेच सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध,पुसेगाव व वडूज, मायणी हि प्रमुख महत्वाची गावे पण सदर मार्गाला जोडली जावीत अशा आशयाचे एक हजार सह्यांचे निवेदन नुकतेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांना रवाना करण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध हे फार पूर्वीपासून मोठे राज संस्थान असून,येथे श्री यमाई देवीचे खूप मोठे शक्तीपीठ आहे.तसेच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजा भवानराव पंतप्रतिनिधी वस्तू संग्रहालय असून,मोठे शैक्षणिक केंद्र आहे.त्याच बरोबर श्री क्षेत्र पुसेगाव हे श्री सेवागिरी महाराज मठ संस्थान तीर्थ क्षेत्र आहे.त्याच बरोबर वडूज हे तालुक्याचे मध्यवर्ती सर्वात मोठे विकसित गाव असून,येथे 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीत 9 हुतात्म्यांचे बलिदान क्षेत्र आहे. तसेच मायणी हे पण श्री यशवंत बाबा महाराज व श्री सरूताई यांचे वास्तव्य लाभलेले शक्ती पीठ आहे.तेव्हा सदर मार्गाच्या नवीन रचनेत या अतिशय महत्वाच्या गावांचा समावेश व्हावा.अशी आग्रही मागणी खटाव तालुक्यातील नागरिकांनी या निवेदनात केली आहे.
राज्य सरकार पातळीवर या बाबतची अधिसूचना लवकरच निघणार असून,येत्या तीन वर्षात हा रस्ता पूर्ण होणार आहे.त्या बाबतचे जमीन संपादनाचे कार्य लवकरच सुरू होणार आहे.
या महामार्गा बाबत मा.मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस हे विशेष प्रयत्नशील असून,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना या बाबतची कार्यवाही तातडीने करण्याबाबत त्यांनी आढावा घेवून सूचना केल्या आहेत.या महामार्गामुळे माण व खटाव तालुक्याच्या विकासाला वेगाने गती मिळू शकेल असे सर्व जाणकारांनी आपले मत व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment