गणेश नगर (कोर्टी) येथे कातकरी समाजासाठी जनजागृती व समुपदेशन कार्यक्रम उत्साहात.
उंब्रज दि ०१ : रवी वाकडे
गणेश नगर (कोर्टी) येथे कातकरी समाजातील नागरिकांसाठी कोर्टी ग्रामपंचायत, उंब्रज पोलीस ठाणे, रोटरी क्लब आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला कातकरी समाजातील महिला, युवक-युवती आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधत अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह, कमी वयात होणारी गर्भधारणा आणि त्यातून आई व जन्माला येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अल्पवयीन वयात गर्भधारणा झाल्यास आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच त्याचे सामाजिक व कायदेशीर परिणामही गंभीर असतात, हे त्यांनी अतिशय सोप्या व समजेल अशा ग्रामीण भाषेत उपस्थितांना पटवून दिले. समाजातील प्रत्येकाने अशा चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रजच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया खंडागळे यांनी महिलांशी थेट संवाद साधत कमी वयातील विवाह व गर्भधारणेमुळे होणारे आरोग्याचे धोके समजावून सांगितले. गर्भधारणेची वेळेवर नोंदणी केल्यास शासनाच्या विविध आरोग्य योजना, आर्थिक लाभ व अनुदानाचा लाभ मिळू शकतो, याबाबत त्यांनी माहिती दिली. अल्पवयीन वयात विवाह करणे हे कायद्याने चुकीचे असून त्याचे परिणाम संबंधित कुटुंबालाच भोगावे लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोटरी क्लबच्या अध्यक्षांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक जागृती यांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील प्रत्येकाने मुला-मुलींना शिक्षणाची संधी देऊन त्यांचे भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
समुपदेशनानंतर कातकरी समाजातील युवक-युवतींनी यापुढे आपल्या समाजात अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होऊ देणार नाही, तसेच अशा चुकीच्या प्रथांना थारा देणार नाही, अशी ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना दिली.
या जनजागृती कार्यक्रमामुळे कातकरी समाजात आरोग्य, शिक्षण आणि कायद्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली असून, समाजहिताच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास ग्रामसेवक ज्योतीराम ढणे, आरोग्य निरीक्षक विकास गरुड, शिक्षण समितीचे अध्यक्ष अमोल यादव, तसेच विवेकानंद जोशी, विनायक जाधव, कमलाकर पाटील, प्रवीण यादव, जयश्री सर्जे, ज्योती थोरात, सुनंदा वाघमारे आणि उर्मिला निकाळजे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment